Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

पिंपरी – चिंचवड : मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी  कलाकारांना दिला.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर  मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय  नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले.

शंभराव्या नाट्य संमेलनात  माझ्या मुलाखतीचा विषय ‘नाटक आणि मी’ असा आहे. मात्र मला वाटते मुलाखतीचा विषय ‘मी केलेली नाटकं’ असा हवा होता, अशी मिश्किल टिपणी करत राज ठाकरे म्हणाले, नाटक न पाहीलेला मराठी माणूस सापडणे अवघड आहे. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो नाटक ते अटक असा आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथेच मोठे झाले. आपण राज्यकर्ते होतो पण आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत. शंभर फोटो इथे  लागले आहेत त्यांना आजची अवस्था बघितल्यावर काय वाटत असेल?

फिल्म मेकिंग हे  माझं पहिलं प्रेम आहे, मात्र नाटकाबद्दल माझ्या मनात कायम कुतूहल आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकं यामध्ये नाटक हे सर्वात आव्हानात्मक माध्यम आहे असे मला वाटते. परदेशात गेल्यावर आपण मोठमोठी नाट्यगृह पाहतो. उत्तम दर्जाची नाटकं पाहतो. ती आपल्याकडे पण व्हायला पाहिजेत. त्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी प्रस्ताव तयार करावा. तुमची मागणी पूर्ण व्हावी म्हणून मी पुढाकार घेईल, असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सध्या राज्यात जे जाती पातीचे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये मराठी माणसाने अडकु नये असे ठाकरे यांनी सांगितले.

Spread the love