Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

विश्‍वगुरू ही उपाधी नसून ज्ञानाची तपस्या आहे राज्यपाल अरिफ महंमद खान यांचे मत; आठव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप

पुणे, ५ एप्रिल: भारताला प्राचीन काळापासून ज्ञानाचे दालन म्हणून ओळखले जात आहे. ऋषीमुनींनी साहित्यांची निर्मिती करून जगाला विश्‍वशांती व मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविला. मध्यांतराच्या काळात देशावर अनेक अक्रमणे झाली, मात्र भारतीय ज्ञानाच्या दालनाचा विस्तार वाढतच गेला.

भारत पूर्वी ही विश्‍वगुरू होता आणि आता आपल्याकडे पुन्हा विश्‍वगुरू बनण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. विश्‍वगुरू ही केवळ उपाधी नसून ती ज्ञानाची तपस्या आहे. असे मत केरळचे राज्यपाल अरिफ महमंद खान यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम विश्‍वशांती घुमटात आठव्या जागतिक धर्म परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, कर्वे गुरूजी,अभिनेते राहुल सोलापूरकर, डॉ. प्रियंकर उपाध्याय, स्वामी रितेश्‍वर महाराज हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.

तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचित्रा नागरे- कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. संजय उपाध्ये यांना श्रीमद् भगवतगीता भाष्यकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. अरिफ महंमद खान म्हणाले, ग्रंथ आपल्याला भूतकाळा विषयी सांगतात. भारत देश ज्ञानाचे दालन म्हणून ओळखला जात होता. हा देश आज ही माता सरस्वतीच्या तत्वावर सुरू आहे. शिक्षण हे बदल घडविण्याचे साधन आहे. शिक्षणा शिवाय कोणत्याही प्रकारचे यश मिळत नाही.

जगातील कोणताही देश भारताला विश्‍वगुरू बनविण्यापासून थांबवू शकत नाही. प्रत्येकात क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानाची साधना करावी. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षणाची प्रक्रिया सतत सुरू ठेवावी.
डॉ. विजय भटकर म्हणाले, ही धर्म परिषद विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित आहे. यात मानव कल्याण, विश्‍वशांती, सर्व धर्मांचा आदर आणि समानतेचा विचार मांडण्यात आला. भविष्यात भारत सुपर पॉवर म्हणून उदयास येईल.

या धर्म परिषदेच्या माध्यमातून जगाला शांततेचा संदेश देण्यात आला. राहुल सोलापूरकर म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माने क्रांती निर्माण होईल. पाश्‍चिमात्य देशाचा विज्ञान आणि भारताचे अध्यात्म यांचा समन्वय झाल्यास भारत विश्‍वगुरू बनेल. युवकांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्म शास्त्राला अभ्यासात महत्व दिल्यास भारताची जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल.

डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, मानव कल्याणासाठी सर्वांनी एकत्र यावे. राष्ट्र सेवेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. सर्व धर्मांचे नेते येथे एकत्र येऊन विश्‍वाच्या शांतीसाठी आपले योगदान देत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाने जगाला काळजीत टाकले आहे, त्यामुळे विश्‍वशांती साठी पुढाकार घ्यावा. आध्यात्मिकशास्त्र आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा जगाला अर्पण केली आहे.

डॉ. प्रियंकर उपाध्ये म्हणाले, जगातील सर्वच विद्यापीठातून रोजगार देण्याच्या कार्याबरोबरच मूल्याधिष्ठित शिक्षण दिले जावे, यामुळे सर्वोतम व्यक्तित्व घडेल. धर्मा-धर्मातील शांतता आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये सुसंवाद व्हावे. शांतता हा जगण्याचा मार्ग आहे. शांतता नसेल तर मानव जातीला धोका आहे.

राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, राजकारणाच्या शिक्षणाबरोबरच आध्यात्मिकरण या विषयावर नवे पाठ्यक्रम सुरू केले जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना जीवन दर्शन घडेल. त्यासाठी वर्ल्ड पीस सिलॅबसची निर्मिती होत आहे. आज या घुमटातून संपूर्ण जगात शांतीचा नारा पोहचेल.
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

Spread the love