Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स.प.महाविद्यालयातर्फे ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ विज्ञान प्रसार महोत्सव

शि.प्र.मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

पुणे : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत महोत्सव होणार आहे, अशी माहिती शि.प्र.मंडळीतर्फे पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के.जैन, सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, केशव वझे, राजेंद्र पटवर्धन, विज्ञान भारतीच्या मानसी मालेगावकर, प्राचार्य डॉ. सविता दातार उपस्थित होते. विज्ञानमंडळ प्रमुख डॉ.संदीप काकडे, समन्वयक डॉ.गीतांजली फाटक, डॉ.सुचेता गायकवाड, मंदार उपासनी आणि सर्व प्राध्यापकांनी महोत्सवाचे नियोजन केले आहे.

महोत्सवात ७५ शास्त्रज्ञ आणि ७५ वैज्ञानिक शोध यांची भित्तिचित्रे बघण्यासाठी उपलब्ध होतील. तसेच डीआरडीओ यांच्यातर्फे भित्तिचित्रे आणि मॉडेल्स देखील प्रदर्शित होणार आहेत. दि.२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत भारतातील ७५ शहरांमध्ये या विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे हा विज्ञान महोत्सव होणार आहे.

विज्ञान महोत्सवात विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान पुस्तक मेळा, विज्ञान साहित्य उत्सव, वैज्ञानिक रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञानामृत प्रश्नमंजुषा अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे. विज्ञान महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गटांमध्ये होतील.

प्रथम तीन क्रमांकांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. विज्ञानामृत प्रश्नमंजूषा दि. २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सर्वांसाठी आॅनलाईन खुली आहे.

महोत्सवातील नियम व स्पर्धा विषयक माहिती https://www.spcollegepune.ac.in/ या संकेतस्थळावर मिळेल. विज्ञान महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. प्रत्येक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये विज्ञानप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love