Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

वंचित विकास संस्थेला म्हसोबा ट्रस्टतर्फे ५१ हजारांचा आरोग्यनिधी
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे ; धार्मिकतेसोबत सामाजिकतेची जोड

पुणे : धार्मिकते सोबत सामाजिकता जपणा-या अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे वंचित विकास संस्थेला ५१ हजार रुपयांचा आरोग्यनिधी देण्यात आला. मंडईमध्ये बुरुड आळीत सुरु असलेल्या म्हसोबा उत्सवात केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचा अंतर्भाव न ठेवता दररोज सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा ट्रस्टने यंदाही सुरु ठेवली आहे.

वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. आरोग्य निधी प्रदान कार्यक्रमाला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उद्योजक राहुल येमुल, अमोल येमुल, अभिनेत्री अंजली अत्रे, उद्योजक संग्राम मुरकुटे, वंचित विकास संस्थेच्या तेजस्वीनी थिटे, म्हसोबा ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी वंचित विकास मधील चिमुकल्यांच्या हस्ते म्हसोबारायाची आरती देखील करण्यात आली.

संदीपसिंह गिल्ल म्हणाले, आपल्या देशाचे भविष्य ही लहान मुले आहेत. त्यामुळे वंचित मुलांच्या अंध:कारमय जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचे काम व्हायला हवे. मुलांना शालेय शिक्षणासोबतच शारिरीक शिक्षण देखील मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण मुलांना प्रोत्साहित करायला हवे. म्हसोबा ट्रस्टने मुलांच्या आरोग्याच्या काळजीसाठी निधी दिला असून हे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव
सोमवार, दिनांक १७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love