Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन

पुणे, दि.६ डिसेंबर :” सहिष्णूतेचा अर्थ म्हणजे वासनेला व क्रोधाला नियंत्रित करणे आहे. आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला विषयाच्या भवसागरातून पार करून किनार्‍यावर घेऊन जाणारे आहे. त्यामुळे येथे येणार्‍या वारकर्‍याचे अंतःकरण पवित्र बनते ”.असे विचार काशी येथील विद्वान व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा यांनी व्यक्त केले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या सोहळ्याला आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कुर्‍हेकर, ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव चिदम्बर महाराज साखरे. विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे, अशोक उमरगेकर, सुरेश वडगावकर, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, देहूचे रमेश काळोखे, तुकाराम काळोखे व ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ.उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.

डॉ. योगेन्द्र मिश्रा म्हणाले,” आळंदी ही संवेदनाची सृष्टी असल्याने येथे सत्याचे संस्कार मिळतात. आपल्यातील जिज्ञासा वृद्धिंगत होऊन समाधान मिळते. आम्हाला देवतांचे संस्कार अंगीकरण्यासाठी जिभेवरील स्वाद आणि शब्द यांचा जपून वापर करावा.”

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”सामाजिक कार्य करतांना नागरिकांचा विरोध होतच असतो. परंतू आपले लक्ष विचलित करुन नये असा सल्ला मला तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या सूत्रानुसार आळंदी येथे घाटाची निर्मिती झाली. येथे गरूड स्तंभ ४३ दिवसांमध्ये व बद्रिनाथ येथे ६३ दिवसात माता सरस्वती मंदिराची निर्मिती झाली. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग याचेच हे फलीत आहे.”

अशोक उमरगेकर म्हणाले,” आळंदीसाठी राजकीय क्षेत्र व महाराष्ट्र सरकारला जे काम करता आले नाही ते काम डॉ. कराड यांनी केले. त्यांनी शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केले आहे. सर्वप्रथम वारकर्‍यांनासाठी शौचालयांची निर्मिती केल्यानंतर त्यांनी घाट व गरुड स्तंभ उभा केला.”

चिदंबर महाराज साखरे म्हणाले.” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. त्यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आपल्या मनाचा तोल सांभाळण्याचे कार्य संत वाग्ड़मय करतात त्यामुळे त्यांचे वाचन करावे.”

प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या, “भारतीय शिक्षण पद्धतीत अध्यात्माचा समन्वय व्हावा या साठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु डॉ. कराड यांनी ४०वर्षापूर्वीच हा प्रयोग केला आहे. तीर्थ क्षेत्रापासून ज्ञान तीर्थ क्षेत्रापर्यंतचा हा प्रवास अद्भूत आहे.”

डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” ७०० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी विश्वात्मक कल्पना मांडून जाती पातीमध्ये दुभांगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता. आळंदीची भूमी जगाच्या इतिहासात मानवाचे गुरूकुल बनले आहे. वारी म्हणजे मानवाच्या चित्त शुद्धीचा आध्यत्मिक महोत्सव आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” हा मंच ज्ञानाची दिवाळी साजरा करण्यासाठी आहे. डॉ. कराड व ह.भ.प. साखरे महाराज यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला कळण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. इंद्रायणीच्या दोन्हीं किनार्‍यावर शिक्षण घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढावी. तसेच देशातील सर्व नद्यांच्या किनार्‍यावर शिक्षणाची ज्ञान केंद्रे बनावीत.”
त्यानंतर पं.वसन्तराव गाडगीळ व विठ्ठलराव काळोखे यांनी आपले विचार मांडले.

डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
ह.भ.प. शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.

Spread the love