Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तील क्षिती जोगच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत.

चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा. या चित्रपटात तिची लक्षवेधी व्यक्तिरेखा असून तिने ती उत्तमरित्या साकारली आहे. तिच्या या उत्तम अभिनयामुळेच अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी क्षितीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका बिग बजेट चित्रपटात, इतक्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर, कलाकारांसोबत काम करून क्षितीने तिच्या चाहत्यांना एक सुखद अनुभव दिला आहे.

या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती जोग म्हणते, ” यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता.”

तर दिग्दर्शक करण जोहर म्हणतात, ” क्षितीचा अभिनय मी पाहिला असून ती एक गुणी अभिनेत्री आहे. मला खात्री होती ती या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देणार. चित्रपट प्रदर्शित झाला असून क्षितीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्षिती अतिशय प्रोफेशनल अभिनेत्री आहे. कामाच्या बाबतीत ती अतिशय प्रामाणिक आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती जी मेहनत घेते, ते मी सेटवर पाहिले आहे आणि म्हणूनच ती कोणतीही भूमिका इतकी चपखल बजावू शकते.”

Spread the love