Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राज्याच्या तिजोरीच्या सक्षमतेवर मुख्याध्यापक- शिक्षकांचे निर्णय अवलंबून – खासदार डॉ.अमोल कोल्हे

मुख्याध्यापकांच्या ६० व्या हीरक महोत्सवी राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनात गुणवंत मुख्याध्यापक राज्य पुरस्कार वितरण सोहळा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनाचे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे संयोजन

पुणे : कोविडच्या मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महसूलावर परिणाम झाला आहे. जीएसटी व महसूल न मिळाल्याने तिजोरीवर ताण पडला आहे. यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली, तरी देखील अजित पवार यांनी ती योग्यरितीने समतोल ठेऊन सांभाळली आहे.

तिजोरीवर ताण असताना देखील आपल्या सगळ्यांनाच पुढे जावे लागेल. त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षक यांच्या वेतन, पेन्शन व इतर मागण्यांचे निर्णय राज्याच्या तिजोरीच्या सक्षमतेवर अवलंबून आहेत.

महाविकास आघाडी हे प्रश्न सोडविण्यास सकारात्मकपणे मार्ग काढेल, असे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील १५०० मुख्याध्यापकांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या ६० व्या हीरक महोत्सवी राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचे आयोजन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले.

हे अधिवेशन ओझर, जुन्नर येथील श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनात पार पडले. यावेळी गुणवंत मुख्याध्यापक राज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे, विधानपरिषदेचे आमदार डॉ.सुधीर तांबे, गणपतराव बालवडकर, राजेंद्र कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या जर्नल चे प्रकाशनही यावेळी झाले.

अधिवेशनाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डॉ.आर.डी.कदम, महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील, सचिव शांताराम पोखरकर, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव सुरेश कांचन, चंद्रकांत मोहोळ, महेंद्र गणपुले, सुभाष माने, अरुण थोरात, ज्ञानेश्वर म्हात्रे, आदिनाथ थोरात, हनुमंत कुबडे, तबाजी वागदरे, नंदकुमार सागर, प्राचार्य अविनाश ताकवले, मधुकर नाईक, प्रसाद गायकवाड, शिवाजी किलकिले आदींनी संयोजन केले होते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साधारण १५०० ते २००० माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, देशात जाती-धर्माची चौकटीला हात घातला जात असून या बिया पेरल्या जात आहेत. त्यामुळे उद्याचे काय याचा विचार आज करायला हवा.

सामाजिक विषमता उपटून फेकावी लागेल. तरुणाईमध्ये शाश्वत व रचनात्मक विकासाचे बीज रोवून तरुणाईची चांगली घडणघडण करण्याकरीता प्रयत्न व्हायला हवेत.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, शिक्षण व आरोग्याला सर्वात जास्त प्राध्यान्य द्यायला हवे. जग आणि भारताच्या तुलनेत आपण शिक्षणाच्या बाबत उदासिन का? याचा विचार करुन शिक्षणातील त्रुटी सुधारल्या गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

शरद सोनावणे म्हणाले, शिक्षणाला दिशा देण्याचे काम शिक्षक करतो. राज्य सरकार व मुख्याध्यापक-शिक्षक यांमध्ये वारंवार संघर्ष होतात. त्यावर अंतिम निर्णय लवकर काढायला हवा.

डॉ.सुधीर तांबे म्हणाले, विनाअनुदानित हे तत्व कायमचे संपवून पुढील पाच वर्षात १०० टक्के शाळा अनुदानित करण्याकरीता शासनाने प्रयत्न करायला हवे. आर्थिक अडचणी सोडवून पुढे जाण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले.

जे.के.पाटील म्हणाले, मुख्याध्यापक हा शाळेचा कणा आहे. शाळेसह आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी देखील तो कार्य करतो. सेवाभाव वृत्तीने शिक्षक कार्य करतात. त्यामुळे अशा शिक्षणाच्या शिल्पकारांना बळ द्यायला हवे.

*कृषी विधेयकावर डॉ.अमोल कोल्हे म्हणाले देर आए , दुरुस्त आए

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या संघर्षात ८०० कष्टक-यांनी हौतात्म्य पत्करले. विरोधी पक्षांनी मूठ बांधून संघर्ष केला. त्यामुळे माघार घ्यायची वृत्ती नसतानाही कायदे मागे घेण्याची घोषणा झाली. त्यामुळे देर आए, दुरुस्त आए असेच म्हणावे लागले, असे खासदार अमोल कोल्हे यांनी कृषी विधेयकाविषयी बोलताना सांगितले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love