Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ महानाट्याला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणेकरांनी अनुभवला क्रांतिकार्याचा रोमहर्षक इतिहास

पुणे : दिनांक १९ शुभ्र घोड्यावर स्वार होऊन रंगमंचावर अवतरणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, भगवान बिरसा मुंडा,क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वस्ताद लहुजी साळवे,लाठ्या-काठ्या आणि तलवारबाजीची प्रात्यक्षिके व या सर्वांवर कळस चढविणारी ‘गोंद्या आला रे…’ची आरोळी आणि त्यानंतर अत्याचारी रँडला गोळी घालून त्याचा केलेला अंत…

अशा अनेक रोमहर्षक घटनांनी भरलेले महानाट्य ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ शनिवारी (१८ जून) तब्बल वीस हजार पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभवले. निमित्त होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चापेकर बंधूच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे.

शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे महानगर यांच्या वतीने स.प.महाविद्यालय मैदान येथे झालेल्या या महानाट्याला शालेय विद्यार्थी, नागरिक आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने गर्दी करून त्यातील प्रत्येक प्रसंगाला उत्स्फूर्त दाद दिली.

इतिहास प्रेमी मंडळ संस्थेच्या वतीने सादर होणाऱ्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मोहन शेटे यांनी केले तर वैशाली इनामदार आणि अभिषेक शाळू यांनी सहाय्यक दिग्दर्शन केले. सुमारे १२५ कलावंत,भव्य रंगमंच,नृत्य व संगीत आणि प्रत्यक्ष घटनेची जिवंत मांडणी यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

दामोदर,बाळकृष्ण आणि वासुदेव हरी चापेकर या तीन बंधूंनी केलेल्या रॅंड वधाला १००वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १९९७ मध्ये या महानाट्याचा प्रयोग करण्यात आला होता. या घटनेला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याचा पुन्हा प्रयोग करण्यात आला.त्यात चापेकर बंधूंबरोबरच त्यांच्या अगोदरच्या व नंतरच्या क्रांतिकारकांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात आला.

याशिवाय हेमंत मावळे यांचे पोवाडे गायन,आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि राहुल सोलापूरकर यांचे निवेदनसुद्धा या महानाट्यात ऐकायला मिळाले.

चापेकर बंधूंच्या वंशजांचा सत्कार

या महानाट्याच्या प्रयोगापूर्वी चापेकर बंधूच्या कुटुंबियांचे वारस व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चापेकर कुटुंबियांचा रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस.के. जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महानाट्य समितीचे संयोजक रवींद्र शिंगणापूरकर आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्वस्त पराग ठाकूर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसेनानी दामोदर हरी चापेकर यांच्या नातसून सौ. प्रतिभा प्रफुल्ल चापेकर, स्वातंत्र्यसेनानी बाळकृष्ण चापेकर यांच्या पणतू सून सौ. अनुया चापेकर
श्री. राजीव चापेकर, पणती सौ. मंजिरी गोडसे व सौ.सोनल जोशी यांची उपस्थिती होती. ‘गर्जली स्वातंत्र्य शाहिरी’ या पुस्तकाचे लेखक वि.श्री. जोशी यांचे पुत्र चंद्रशेखर जोशी यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना अॅड एस.के. जैन म्हणाले की राष्ट्रभक्ती व त्याग काय असते,हे तरुण पिढीला कळावे यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना खरा इतिहास कळायला हवा.खरा इतिहास कळाला तर स्वातंत्र्यासाठी कोणाला पुन्हा बलिदान करण्याची गरज पडणार नाही. मात्र चापेकर बंधूंसारखे राष्ट्रासाठी त्याग करणारे अनेक देशभक्त त्यामुळे तयार होतील. त्यामुळेच असे उपक्रम आणखी व्हायला हवेत.

रवींद्र वंजारवाडकर म्हणाले की भारताचा आजचा कालखंड महत्त्वाचा आहे. जागतिक पटलावर आपला देश पुढे जात आहे. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम हा सर्व समाजघटकांचा व वर्गांचा लढा आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम जसा ब्रिटीश सत्तेविरुद्ध होता तसा तो जगातील सर्व वसाहतवादी शक्तींविरुद्ध होता.इतिहासात काही नोंदी असतात तर काही नसतात.मात्र या महानाट्यामुळे अशा अनाम क्रांतिवीरांबद्दल आपल्या मनात कृतज्ञता निर्माण होईल.

रवींद्र शिंगणापूरकर यांनी आभार मानले तर पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. नाटकाचे दिग्दर्शक मोहन शेटे,सहाय्यक दिग्दर्शक वैशाली इनामदार व अभिषेक शाळू,महानाट्याच्या समन्वयक वर्षा न्यायाधीश, व्यवस्थापक,कलावंत आणि बॅकस्टेज रंगकर्मींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Spread the love