Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान निर्मित ‘संगीत सौभद्र’ला रसिकांची उत्स्फूर्त दाद – छोटा गंधर्व युगाची रसिकांना आली अनुभूती..!

पुणे : नाट्यपदांना मिळालेला टाळ्यांचा कडकडाट, वन्समोअरची मागणी आणि प्रयोगानंतर ‘वा छान’, ‘खूप सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘बहारदार’, ‘क्या बात आहे’ अशा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया.. हे अनुभवायला मिळाले ते ‘संगीत सौभद्र’च्या निमित्ताने. संगीत सौभद्रच्या शुभारंभाचा प्रयोग रसिकांना छोटा गंधर्व युगाची अनुभूती देणारा ठरला.

युवा कलाकारांच्या साथीने जुनी संगीत नाटके पुन्हा मंचस्थ करून रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणे आणि मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने कार्यरत असलेल्या स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेने संगीत सुवर्णतुला नाटकाच्या यशस्वी निर्मितीनंतर अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र हे तीन अंकी नाटक रंगमंचावर आणले असून नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला.

सुमारे चार तास रंगलेल्या संगीत सौभद्रमधील अवीट गोडीची नाट्यपदे ऐकून जुन्या जाणत्यांना छोटा गंधर्व युगाची आठवण झाली तर युवा पिढीतील रसिकांना एक अजरामर कलाकृती अनुभवायला मिळाली.

विशेष म्हणजे पहिल्या प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ गायक-अभिनेत्री मधुवंती दांडेकर, संगीतकार राहुल रानडे, छोटा गंधर्व यांच्या कन्या सुलभा सौदागर, प्रसिद्ध गायक-अभिनेते हृषिकेश बोडस, शशांक चांदोरकर, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर, उपाध्यक्षा सुचेता अवचट, खजिनदार अशोक अवचट यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन जयश्री कुबेर यांनी केले.

‘नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया’, ‘लग्नाला जातो मी’, ‘वद जाऊ कुणाला शरण गं’, ‘पांडु नृपती जनक जया’, ‘नाही झाले षण्मास मला राज्य सोडूनी’, ‘पावना वामना या मना’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘लाल शाल जोडी जरतारी’ ‘प्रिये पहा’ अशी एकाहून एक सरस नाट्यगीते सुरेल ऑर्गन आणि बहारदार तबल्याच्या साथीने रोमांचित करणारी ठरली.

संगीत सौभद्रचा पहिला प्रयोग सुमारे 142 वर्षांपूर्वी म्हणजे 1880 साली झाला असला तरी या नाटकाची मोहिनी जराही कमी झालेली नाही, हे शुभारंभाच्या प्रयोगाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादावरून दिसून आले. या नाटकातील स्वरराज छोटा गंधर्व यांच्या कृष्णाच्या भूमिकेने त्या काळी लोकप्रियतेचा कळस गाठला होता.

सौभद्र आणि त्यातील कृष्ण म्हणजे छोटा गंधर्व हे जणू समीकरणच होते अशी आठवण जुन्या जाणत्या प्रेक्षकांनी सांगितली. कलाकारांच्या वेषभूषा, केशभूषेचेही विशेष कौतुक झाले.

भाग्यश्री काजरेकर, सुकृत ताम्हनकर, अभिषेक अवचट, निखिल केंजळे, तेजस मेस्त्री, माधुरी अवचट, सयाजी शेंडकर, ऋतुपर्ण पिंगळे, स्मिता पाटील, कौमुदी लिमये, विश्वनाथ कुलकर्णी हे प्रमुख भूमिकेत होते. संजय गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला) यांची साथसंगत होती. बाबा पार्सेकर यांनी नेपथ्याची तर यशोदीप खरे, सागर खांबे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

युवा कलाकारांचा सहभाग असलेल्या संगीत सौभद्र या नाटकाची निर्मिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर यांची तर दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अशोक अवचट यांचे होते. संगीत मार्गदर्शन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सुचेता अवचट आणि संगीत सौभद्रमध्ये कृष्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध गायक हृषिकेश बोडस यांनी केले.

Spread the love