Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

प्रख्यात अभिनेत्री, भारतीय कथ्थक नृत्यांगना प्राची शाह पंड्या यांच्या हस्ते सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे उद्घाटन

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांना मिळणार संगीत, नृत्य, गायन व अन्य कला शिकण्याची संधी

पुणे : प्रख्यात अभिनेत्री आणि भारतीय कथ्थक नृत्यांगना प्राची शाह पंड्या यांच्या हस्ते सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या संचालक शीला ओक आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पंड्या यांनी कत्थकच्या काही टिप्स दिल्या आणि नृत्य करवून घेतले.

प्राची शाह पंड्या यांना नुकताच ‘सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्राप्त झाला असून, पंड्या यांनी ‘कोशिश-एक आशा’, ‘कुंडली’,’कहीं दिया जले कहीं जिया…’, ‘पिया का घर’, ‘भाभी’,’रंगोली’, ‘ये प्यार ना होगा कम’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ- फिर एक बार’ अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘हे राम’ या तमिळ चित्रपटातून प्राची यांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. ‘इसी लाईफ में’, ‘स्टूडंट ऑफ द इयर’,’राजा नटवरलाल’, ‘एबीसीडी २’, ‘जुडवा २’,’लक्ष्मी’ आणि नुकताच आलेला ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ‘इचार ठरला पक्का’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

प्राची यांना कथ्थकची विशेष, तसेच तानपुरा वाजवण्याची आवड आहे. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नृत्य, गायन, संगीत रुची जपण्यासाठी आणि कला क्षेत्रातील त्यांच्या विकासासाठी सेंटरचे उद्घाटन होत आहे, ही महत्वपूर्ण बाब असल्याचे सुषमा चोरडिया यांनी नमूद केले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांनीप्राची शाह पंड्या यांचे स्वागत केले आणि त्यांना संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामाची माहिती करून दिली.

प्राची शाह पंड्या म्हणाल्या, “सूर्यदत्त कॅम्पस हरित, अत्यंत सुंदर आणि स्वछ आहे. प्रांगणात येताच मन प्रसन्न होते. माझ्या हस्ते सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे झाले याचा आनंद आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या सेंटरचा लाभ होईल. मनापासून आणि मेहनतीने केलेल्या परिश्रमाचे आणि कलेत झोकून देण्याचे निश्चित वेगळ्या पातळीवरचे यश प्राप्त होते. कलेच्या प्रांगणात यशापेक्षा प्रवासाला खूप महत्व आहे. व्यक्ती म्हणून हा प्रवास आपल्याला समृद्ध करतो.”

Spread the love