Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान

व्यापारी देशाचा आर्थिक कणा पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती यांचे मत

पुणे : व्यापारी म्हणजे केवळ पैसे कमावणारा माणूस असा समाजामध्ये चुकीचा समज निर्माण झाला आहे, परंतु समाजाला उपलब्ध नसणारी साधने वेळेत उपलब्ध करून देऊन व्यापारी हा एक प्रकारे समाजसेवेचे काम करत असतो. व्यापारी हा केवळ स्वतःच किंवा ग्राहकांचा विकास करत नाही, तर व्यापारी हे खऱ्या अर्थाने देशाचा आर्थिक कणा आहेत, असे मत पद्मविभूषण ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ. के.एच. संचेती यांनी व्यक्त केले.

स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात डॉ. संचेती बोलत होते. माजी आमदार मेधा कुलकर्णी, असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी , उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे, नितीन पंडित, मदनसिंह रजपूत, सूर्यकांत पाठक, किशोर चांडक, अनिल प्रभुणे, सुरेश नेऊरगावकर आदी उपस्थित होते.

डॉ.के.एच.संचेती म्हणाले, व्यापारी कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे प्रामाणिकपणा आणि सचोटी हे गुण मला मिळाले. त्या गुणांच्या आधारावरच मला माझ्या आयुष्यामध्ये यश मिळाले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, बदलत्या युगामध्ये व्यापार करणे हे अतिशय अवघड आहे. त्यासाठी विविध गुणांची गरज असते. व्यापारामध्ये सातत्य टिकवून ठेवून समाजाबरोबर बदलणे आवश्यक आहे. व्यापार केवळ एकट्याने होत नाही तर ते एका संघटनेचे यश आहे. अनधिकृत पथारी व्यवसायिकांमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

सचिन मालपाणी म्हणाले, मालपाणी क्रीम रोल या पुणेरी ब्रँडला नागरिकांनी स्वीकारले, यामध्ये आम्ही धन्यता मानतो. बदलत्या काळाबरोबर व्यावसायिकापुढे नवीन समस्या निर्माण होत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयार राहिले पाहिजे. त्यासाठी व्यापार करण्याच्या पद्धतीत लवचिकता आणली तर छोटे व्यापारी स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतात.

असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार सचिन शामसुंदर मालपाणी यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार शनिवार चौकातील जीवन जनरल स्टोअर्सचे राजेंद्र सुगंधी, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार शनिवार मंडई रस्त्यावरील दीप इलेक्ट्रिकल्सच्या नेहा शहा, कै. साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार रंजीता होडे, फिनिक्स पुरस्कार सखी तुळशीबागचे गणेश रामलिंग आणि उत्कृष्ट दुकान पुरस्कार तुळशीबाग येथील श्री ज्वेलर्स चे चंद्रशेखर खोडके यांना प्रदान करण्यात आले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष बोधनी यांनी प्रास्ताविक केले.

Spread the love