Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान

शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार व्हावेत : शरद पवार

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान
शंकर महादेवन यांच्या ‘सूर निरागस होवो’ने पुणेकर रसिकांवर मोहिनी

पुणे : सातारा, सांगली, मीरज अशा दुष्काळी भागाने महाराष्ट्राला गदिमा, पी. सावळराम अशी अनेक रत्ने दिली त्यातील एक स्व. राम कदम. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना राम कदम यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. साहित्य, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करून शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार काढून माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार म्हणाले शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार केले पाहिजेत, यासाठी असे कार्यक्रम घेणे गरजेचे असते.

सत्काराला शब्दात उत्तर न देता प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी ‘सूर निरागस होवो’ हे सूर आळवून कानसेन रसिकांना तृप्त केले.

रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 13वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार ब्रेथलेस गायनामुळे प्रसिद्धीस आलेले लोकप्रिय गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि कै. वसंतराव देशपांडे यांचा वारसा समृद्ध करणारे युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना आज (दि. 10 मार्च 2022) पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

एक लाख रुपये, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, सुहाना-प्रवीण मसाला उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडीया, प्रतिष्ठानचे निमंत्रक आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड व्यासपीठावर होते. पवार यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. प्रतिष्ठानच्या वतीने पवार यांचा सन्मान तुळशीमाळ घालून करण्यात आला.

प्रतिष्ठानचे कार्य राज्यातील 18 जिल्ह्यात पोहोचले असून भविष्यात प्रतिष्ठानचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा, अशी सदिच्छा देऊन पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी प्रसिद्ध कलाकारांच्या आयोजित मैफलींच्या तसेच महाविद्यालयीन काळातील संगीत रामायणाच्या आठवणी जागविल्या.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, रसिकांच्या नगरीत कलाकारांचा सत्कार होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

प्रतिष्ठानविषयी बोलताना ते म्हणाले, अनेक संस्था स्थापन होतात नंतर त्याची संघर्ष समिती बनते अखेरीस त्या मावळतात, परंतु शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. रौप्य म्हणजे बंदा रुपया, तो आजही खणखणीत वाजतो आहे.

शंकर महादेवन यांनी उपस्थित पुणेकर रसिकांशी मराठीत संवाद साधला. ते म्हणाले, राम कदम यांच्या नावे बालगंधर्व रंगमंदिरात माझा मित्र राहुल देशपांडे याच्या बरोबर सन्मान मिळतो आहे, हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे.

पुण्याने माझे प्रत्येकवेळी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. गायक बोलतो हे कंटाळवाणे आहे म्हणून मी गायनातच रसिकांशी संवाद साधतो, असे सांगून ‘सूर निरागस होवो’ या गीताच्या काही ओळी रसिकांना ऐकविल्या. ‘मोरया मोरया’च्या तालावर रसिकांनीही त्यांना टाळ्यांच्या गजरात साथ केली.

राहुल देशपांडे म्हणाले, राम कदम हे अतिशय मोठे संगीतकार होते, त्यांनी माझ्या आजोबांसाठी अनेक गाणी केली आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, परंतु ते व्यक्ती आणि संगीतकार म्हणून अतिशय साधे आणि प्रामाणिक होते.

सूरांशी प्रामाणिक असणे हे त्यांचे संगीतकार म्हणून वैशिष्ट्य होते. ‘माझे मन राहो तुझे पायी देवा’ या राम कदम यांनी संगीत दिलेल्या गीताच्या काही ओळी देशपांडे यांनी सादर केल्या.

सुरुवातीस लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रतिष्ठानच्या 25 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. 25 वर्षांपूर्वी प्रतिष्ठानचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगीचे छायाचित्र त्यांनी पवार यांना या प्रसंगी भेट दिले.

प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार विवेक थिटे आणि गजानन केणे यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘संत प्रबोधन’ आणि ‘वारसा शिल्पकलेचा’ या अनुक्रमे डॉ. हरिदास आखरे आणि संदीप राक्षे लिखित पुस्तकांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हरिश इथापे यांनी मनोगत व्यक्त केले.

निलेश खाबिया, अरुण यावलीकर, ज्योती हुंडेकर, प्रा. डॉ. सुशील गावंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुमारे 32 वर्षांपूर्वी दिल्लीतील परेडमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळाली होती. त्या वेळी पवार यांच्या हस्ते त्या चमूचा सत्कार करण्यात आला होता. त्या चमुतील विद्यार्थ्यांनी पवार यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार नंदकुमार बंड यांनी मानले.
पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी कार्तिकी गायकवाड, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, सावनी सावरकर आणि ऐवंत सुराणा यांनी राम कदम यांच्या सांगितीक वैभावाचे विविध पैलू दाखविणारा मराठी गाण्यांच्या कार्यक्रम सादर केला.

सचिन इंगळे, राजू दूरकर, समीर शिवगार, केदार मोरे, अर्शद अहमद, राजा साळुंके, अभय इंगळे, अमृता केदार, निलेश देशपांडे यांनी साथसंगत करणार केली तर निवेदन रवींद्र खरे यांनी केले.

Spread the love