Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

शब्द आणि चाल हेच गीताचा आत्मा: राहुल देशपांडे

पुणे : सोपे शब्द आणि सहज लक्षात राहणारी चाला या दोन गोष्टी कोणत्याही गाण्याचा आत्मा असतो. याच दोन्ही गोष्टींचा मिलाफ झाल्याने माझे विठ्ठल रखुमाई हे गीत नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे यांनी व्यक्त केला.

आषाढी एकादशीचे औचित्य साधत स्वरनील एंटरटेनमेंट्स चे निलेश माटे यांच्या वतीने “माझे विठ्ठल रखुमाई” या गीताची निर्मिती करण्यात आली. या गीताचा प्रीमियर स्वरनील एंटरटेनमेंट्सच्या युट्यूब पेजवरून करण्यात आला. यावेळी या गीताचे गायक राहूल देशपांडे, अभिनेते राहूल सोलापूरकर, आनंद इंगळे, स्वरनील एंटरटेनमेंट्सचे नीलेश माटे, युवा संगीतकार सुयश खटावकर, गीतकार देवदत्त भिंगारकर, संगीत संयोजक तेजस चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर म्हणाले की, वारीची परंपरा तशी खुप वर्षापासून आहे. तुकोबा देखील विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते तेव्हा वेळापूरच्या डोंगरावरून तुकोबाना कळसाचं दर्शन झालं, आणि ते धावत सुटले. म्हणूनच २ डोंगर आणि तीन धाव ही प्रथा पडली. आज तुम्ही देखील या गीताच्या रूपात कळसाचं दर्शन झाल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी धाव घेत आहात.

यावेळी बोलताना नीलेश माटे म्हणाले की, विठूरायाचे प्रत्यक्ष दर्शन सध्या घेता येत नसल्याने हे स्वरदर्शन भक्तांना आनंद देईल. स्वर शब्दांच्या माध्यमातून विठ्ठलाची आणि त्याच्या भक्तांची केलेली ही सेवा नक्कीच सगळ्यांना मोहिनी घालेल. या गीताच्या माध्यमातून स्वरनील निर्मिती क्षेत्रात उतरत असून हे पहिलेच पुष्प आम्ही आपणासमोर सादर करताना आनंद होत आहे. विठ्ठलाचे स्वरूप श्रीरंगाचे आहे, आम्ही भावरंगातून पूजा बांधत आहोत.

यावेळी बोलताना संगीतकार सुयश खटावकर म्हणाले, विठुरायाच्या चरणी संगीतसेवा रुजू करत आहोत. काही चाली खूप सहजगत्या होतात. त्या करताना खूप आनंद जाणवतो, याचीच फलश्रुती म्हणजे हे गीत आहे. ही सहज झाली आणि ती नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल. आमची ही सांगीतिक दिंडी लोकरंगात रंगेल असा विश्वास आहे.

यावेळी बोलताना गीतकार देवदत्त भिंगारकर म्हणाले की, गीतासाठी शब्द लिहिताना नेहमीच कस लागतो. मात्र या गीतासाठी मनातील शब्द कागदावर उतरल्याने निश्चित समाधान आहे.

 जाहिरात / प्रसिद्धिसाठी️
संपर्क: *शिवाजी मा. हुलवळे*
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love