Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

आत्मविश्वासाने जग जिंकता येते
संजय घोडावत यांचे प्रतिपादन; ‘एमआयटी एडीटी’त पेरा चॅम्पियनशिपचे पारितोषिक वितरण

पुणे- ‘जगात असाध्य अशी कुठलीही गोष्ट नाही, उच्च ध्येय, पराभवासोबत टिका पचवण्याची क्षमता, कामगिरीतील सातत्य या गोष्टी आत्मसात केल्यास आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करता येते. दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करताना दुर्दम्य आत्मविश्वास बाळगल्यास जगही जिंकता येते,’ असे मत संजय घोडावत समुहाचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग, पुणे येथे प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा) द्वारे आयोजित “पेरा’ प्रीमिअर चॅम्पियनशिपच्या पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी बोलत होते.

अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघाची खेळाडू स्नेहल शिंदे-साखरे, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, ऑलिंम्पियन बॉक्‍सर मनोज पिंगळे, डाॅ. मोहित दुबे, डाॅ.विरेंद्र शेटे, डॉ.अतुल पाटील, प्रा.डाॅ.मोहन मेनन आदी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी कबड्डीपटू स्नेहल शिंदे म्हणाल्या की, खेळात तुमच्या कष्टाला आणि सातत्याला कुठलाही शॉर्टकट नसतो. त्यात एखाद्या मुलीला खेळात करिअर करायचे झाल्यास अनेक समस्या येतात. परंतू स्वतःच्या अनुभवावरून मी सांगेल की, मुलीने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कधीही सोडू नयेत, कारण ‘लाख मुश्किल होगी मंजिलें, पर हम कोशिश भी ना करे ये तो पाप है’. तसेच, क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य व्यासपीठाची आवश्यक असते. पेरा प्रेमियर चॅम्पियनशिपच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंना असेच एक व्यासपीठ मिळवून देण्यात आले आहे, असेही त्यांनी म्हटले.

विश्‍वशांती प्रार्थनेने प्रारंभ झाल्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.सुराज भोयार यांनी केले तर आभार “पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार यांनी मानले.

चौकट
स्पर्धेत एमआयटी एडीटीच्या खेळाडूंचा डंका
३५ हून अधिक विद्यापीठांतील ३ हजारांपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेच्या पदकतालिकेत यजमान एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या खेळाडूंनी सर्वाधिक १६ सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह स्पर्धेवर वर्चस्व राखले. त्यापाठोपाठ सोमैया विद्याविहार विद्यापीठाने दुसरा तर डाॅ.विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला.

Spread the love