Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सहावी रोलबॉल विश्व करंडक स्पर्धा : महिला विभागात भारत तिसऱ्या स्थानी : पुरुष गटात भारत, केनिया उपांत्य फेरीत.

महिला गटातून केनिया संघाला विजेतेपद.

पुणे : महिला गटाच्या अंतिम फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करताना सहाव्या विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटातून भारत व केनिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने इजिप्तला ५-० असे परभूत केले. मध्यंतराला केनिया संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवताना केनिया संघाने विजय साकारला. केनिया संघाकडून व्ही साटीया (३९.१० व ४३.४५) व कैथीन्जी (०.३२ व २५.२४) यांनी प्रत्येकी २ व रोप ज्युडिथने १ (१.३२) गोल केला. इजिप्त संघाला लढतीमध्ये एकाही गोल करता आला नाही.

महिला गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज यादव, युगांडा रोलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा पेनिना काबेंगे, बेलारूस रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष अलेक्सी खाटीलेव्ह, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज चौधरी, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष व विश्वचषकाचे संयोजक संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, आर पी आय चे मंदार जोशी, लहू बालवडकर, सचिव अमोल काजळे पाटील, सतीश कोंडाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशात खेळाला प्रोत्साहन देण्यात येत असून त्याअंतर्गत रोलबॉलच्या ६ व्या विश्वकरंडक स्पर्धेचे २१ एप्रिलपासून पुण्यात आयोजन करण्यात आले. राजू दाभाडे यांनी हा खेळ पुण्यात विकसित केला असून हा खेळ सुमारे ५० पेक्षा जास्त देशात खेळला जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आज झालेल्या महिला गटातील अंतिम सामन्यात केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करुन विजेतेपद पटकावले. त्याबद्दल केनिया संघाचे अभिनंदन सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताने पोलंड संघावर १२-१ अशी एकतर्फी मात केली. मध्यंतराला भारतीय संघाने ७-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून इशिका शर्माने ७ (०.३४, १५.२५, ३३.२५,३४.४९, ३५.२५, ३७.९० व ४६.२१) गोल केले. सुहानी सिंग (२३.१७ व २४.५१) व पूजा चौधरी (१०.३३ व ११.१२) यांनी प्रत्येकी २ तर श्रुती भगतने (२१.२१) एक गोल केला. पोलंड संघाकडून सायनोविक मारियाने (४४.५०) एक गोल केला.

तत्पूर्वी, महिला गटाच्या पहिल्या उपांत्य लढतीमध्ये केनिया संघाने पोलंड संघाला २-१ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पोलंड संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर मात्र, केनिया संघाच्या सटीया मारियाने सलग दोन (३२.४० व ३३.३०) गोल करताना संघाला आघाडी मिळवून दिली. पोलंड संघाकडून नायाचेविझ मलास्काने (३.००) एक गोल केला.

महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये इजिप्त संघाने भारताला ४-३ असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या अतितटीच्या लढतीत मध्यंतराला दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. त्यानंतर मात्र दोन्ही संघांनी जोरदार आक्रमण केले. इजिप्त संघाकडून हबीब केंझी अहमदने २ (४२.२१ व ४६.४९), एल्डेक्कर नेजर (४९.२१) व मुस्तफा रितीज (३३.२८) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताकडून इशिका शर्माने २ (४४.१८, ४६.१९) तर पूजा चौधरीने १ (३६.४८) गोल केला. अंतिम लढत ही केनिया व इजिप्त दरम्यान होणार आहे.

पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने इराण संघाला अतिरिक्त वेळेत ७-५ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ३-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र इराणने जोरदार प्रतिआक्रमण करताना जोरदार खेळ केला. त्यामुळे लढत वेळेत दोन्ही संघांनी ५-५ अशी बरोबरी साधली. अतिरिक्त वेळेत भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ करताना सलग २ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून आदित्य सुतार (००.४५, ४३.३९ व ५५.२३) व हर्षल घुगे (१७.५०, ३६.३६ व ५२.२९) यांनी प्रत्येकी ३ तर सचिन सैनीने १ (२४.००) गोल केला. इराण संघाकडून ओमीद डावरीने ३ (१०.५०, १६.१० व ४१.००) तर साईद मोहसीन (३५.१०) व यासीन खरगरअजीदाबी (३९.१०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.

पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला ७-४ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यापासून केनिया संघाने आक्रमक खेळ करताना मध्यंतराला ५-२ अशी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफ्फिन एसने ४ (४.३०, १३.०५, २२.४२, २७.३७) तर बोनफेसने २ (११.०१, २३.५०) तर केविन मोझेसने १ (४४.३२) गोल केला. इजिप्त संघाकडून हसन अहमद (५.०१, ४९.१३) व ए एम हसन (२.१३, ४७.५३) यांनी प्रत्येकी २ गोल केले.

Spread the love