Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

आपले प्रश्न आपणच सोडविण्याचा निर्धार करा – रुपाली चाकणकर

‘राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून काम करताना कौटुंबिक कलहाची प्रकरणे सर्वाधिक असल्याचे दिसून येते. बेपत्ता होणाऱ्या मुलींचा प्रश्नही मोठा आहे. तसेच भृणहत्या आणि बालविवाह ही देखील समस्या आहे. यासाठी आपल्या सर्वांनाच मोठे काम करावे लागेल.

आपली मुलगी १८ वर्षाची झाल्याशिवाय आणि स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय कोणत्याही आईने आपल्या मुलीचे लग्न करू नये हा संकल्प नवरात्रौनिमित्त केला पाहिजे’ असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज म्हंटले.

पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत संपन्न होणाऱ्या २४ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले आणि स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ११ हजार रुपये, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा अध्यक्षा जयश्री बागुल, समितीच्या उपाध्यक्षा निर्मलाताई जगताप, सदस्या छायाताई कातुरे, विद्याताई साळी, अनुराधाताई वाघोलीकर व प्रांजली गांधी मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलनाने पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर देवीची आरती करण्यात आली. ऋतुजा माने व सहकलावंतांनी याप्रसंगी गणेश वंदना सादर केली. महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करताना म्हंटले की “नवरात्रौ हा स्त्री शक्तीचा महोत्सव आहे. घरातील प्रत्येक मुलीला शिकवलेच पाहिजे. विविध सामाजिक प्रश्नांमुळे मुलींची घटती संख्या आणि मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे याकडे समाजाने विचारमंथन केले पाहिजे.”

याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर आबा बागुल म्हणाले की , हा महिला महोत्सव सलग २४ वर्षे चालू आहे. ही सारी श्री. लक्ष्मीमातेचीच कृपा आहे. पुणे नवरात्रौ महोत्सव व पुणे नवरात्रौ महिला महोत्सव या माध्यमातून हजारोंना आधार देण्याचे विविध उपक्रम सातत्याने चालू असून सांकृतिक , शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक , अध्यात्मिक याबरोबरच हरवेलेले संस्कार समाजात रुजवण्यासाठी ‘संस्कारमाला’ हे उपक्रम समाजाला आधार देतात याचे समाधान आहे.

याप्रसंगी रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, “मुलगी सासरी जातांना जमवून घे असे आई मुलीला सांगत असते. मात्र आता आईनी असे सांगितले पाहिजे की सासरचे तुला जेवढे सन्मानाने वागवतील त्याच्यापेक्षा जास्त सन्मानाने तू त्यांना वागव. मात्र हुंड्यासाठी छळ होऊ लागला तर जाब विचारायला शिक.

कुठलाही उपक्रम सुरु करणे सोप्पे असते चालू ठेवणे मात्र अवघड असते. गेली २४ वर्षे पुणे नवरात्रौ महिला महोत्सव मोठ्या उत्साहात चालू आहे ही कौतुकाची बाब आहे. जयश्री बागुलांच्या मागे आबा बागुल भक्कमपणे उभे आहेत ही कौतुकाची बाब आहे. आपल्याला संविधान देऊन महिलांना हक्क मिळून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाईंच्या हाती लेखणी देणारे महात्मा फुले हे पुरुषच होते. समाजात काम करतांना पती, भाऊ, वडील यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. मात्र आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. त्यासाठी नवरात्रौनिमित्त संकल्प करूया असे त्या म्हणल्या.

सत्काराला उत्तर देताना Rescuing Every Distressed Indian Overseas (REDIO) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वदेश सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील म्हणल्या की, “तेजस्विनी पुरस्कार मिळाला हा लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात सुखरूप परत आणणे हे मी काम करते. यामध्ये महिलांना खूप मोठा आधार मिळत असतो. पुणे नवरात्रौ महोत्सवात परवा महर्षी पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे माझे गुरु असून त्यांचे फार मोठे सहकार्य या कामात मिळाले. तसेच माझे पती व कुटुंबीय यांचे देखील या कामी मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि माझे पती व कुटुंबीय यांना मी हा पुरस्कार समर्पित करते.”

आंतरराष्ट्रीय कीर्तीची लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले म्हणाल्या की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावण्याची संधी मला मिळाली याचे मला खूप समाधान आहे.”

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले. आभार प्रदर्शन महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी केले. कार्यक्रमात महिलांची प्रचंड मोठी गर्दी होती.

या उद्घाटन सोहळ्यानंतर महिलांसाठी असणारी ‘वेशभूषा’ स्पर्धा संपन्न झाली. सौ. जयश्री बागुल अध्यक्षा, पुणे नवरात्रौ महिला महोत्सव

Spread the love