Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘कृत्रिम बुद्धिमत्ता व तत्रंज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रावरील परिणाम’वर
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे राष्ट्रीय परिषद

  • प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची पत्रकार परिषदेत माहिती; ‘सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्कार २०२३’चे शनिवारी वितरण

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च यांच्यातर्फे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व तत्रंज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रावरील परिणाम’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांना सन्मानित करण्यासाठी ‘सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. शुभदा जोशी, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर, संचालक प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “शनिवार, दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती प्रमुख पाहुणे, तर योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण गंगवाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ४ ते ६ या वेळेत राष्ट्रीय परिषद, तर ६ ते ७.३० या वेळेत पुरस्कार वितरण होईल. डॉ. संचेती यांना ‘सुर्यरत्न-द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ पुरस्काराने, तर डॉ. विनोद आणि डॉ. गंगवाल यांना ‘सूर्यभूषण ग्लोबल अवॉर्ड २०२३’ने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ, न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ, लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, त्वचारोगतज्ञ डॉ. नरेंद्र पटवर्धन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, न्यूरो फिजिशियन डॉ. सुधीर कोठारी, इंडोक्रेनॉलॉजिस्ट डॉ. उदय फडके, पॅथॉलॉजिस्ट डॉ. नितीन धांडे, फिजिशियन डॉ. माधुरी जोगळेकर, आयुर्वेदाचार्य डॉ. लीना बोरुडे, डॉ. कीर्ती भाटी यांच्यासह इतर डॉक्टरांना उल्लेखनीय वैद्यकीय सेवेसाठी ‘सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ देऊन गौरवण्यात येणार आहे.”

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्र व आरोग्य सुविधा दिवसेंदिवस तंत्रज्ञानाभिमुख व प्रगत होत आहे. कृत्रिम बुद्धिमतेचा वाढता वापर यामुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. या बदलणाऱ्या परिस्थितीविषयी उहापोह करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिकेत जोशी, डॉ. सुरेश शिंदे व डॉ. पुष्कर खेर या चर्चासत्रामध्ये आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमात जनरल फिजिशियन, न्यूरो फिजिशियन, न्यूरो सर्जन, कार्डियोलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिशियन, डायबेटॉलॉजिस्ट, गायनॅकोलॉजिस्ट, कान-नाक-घसा तज्ज्ञ, आयुर्वेदाचार्य आदी सहभागी होणार आहेत. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजियोथेरपी आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.”

फोटो ओळ :
आपटे रस्ता : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व तत्रंज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रावरील परिणाम’वर सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेची माहिती देताना पत्रकार परिषदेत डावीकडून प्रशांत पितालिया, डॉ. सिमी रेठरेकर, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. शुभदा जोशी.

Spread the love