Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हास्यचित्रांच्या कारकिर्दीला 70 वर्षे पूर्ण


कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन आणि गंगोत्री होमस्‌ ॲन्ड हॉलिडेजतर्फे ‘सलाम हसऱ्या रेषांना’ प्रदर्शनीचे आयोजन

29 ते 31 जुलै दरम्यान बालगंधर्व कलादालनात व्यंगचित्रविषयक विविध अभिनव उपक्रम
नाट्य-चित्रपट अभिनेते दिलीप प्रभावळकर घेणार शि. द. फडणीस यांची मुलाखत

पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस 29 जुलै 2022 रोजी 98व्या वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या कारकिर्दीलाही 70 वर्षे पूर्ण होत आहेत. व्यंगचित्रांच्या दुनियेतील त्यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी ‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’ या मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होमस्‌ ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आणि व्यंगचित्रविषयक अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 70 पेक्षा जास्त मराठी व्यंगचित्रकारांची शब्दविरहित हास्यचित्रे या निमित्ताने प्रदर्शित केली जाणार असून यात प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचाही सहभाग असणार आहे. हा अनोखा उपक्रम हास्यरसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

प्रदर्शन पुणे येथील बालगंधर्व कलादालनात 29, 30 व 31 जुलै 2022 रोजी भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनात शि. द. फडणीस यांच्या निवडक हास्यचित्रांचा समावेश असणार आहे, अशी माहिती ‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’चे माजी अध्यक्ष चारुहास पंडित आणि गंगोत्री होमस्‌ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी ‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’चे सचिव योगेंद्र भगत व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, गंगोत्री होमस्‌ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे, शि. द. फडणीस यांच्या कन्या रूपा देवधर, लीना गोगटे आदी उपस्थित होते. ‘तुमचे व्यंगचित्र तुमच्या समोर’ हा अनोखा उपक्रमही सलग तीन दिवस राबविला जाणार आहे.

‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’ ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेली मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आहे. व्यंगचित्रकारांसाठी, व्यंगचित्रकलेसाठी व्यंगचित्र प्रदर्शने, कार्यशाळा, संमेलने, ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा सन्मान असे विविध उपक्रम आजपर्यंत ‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’ने यशस्वीरीत्या राबवले आहेत.

शुक्रवार, 29 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचे हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शि. द. फडणीस यांची प्रकट मुलाखत दिलीप प्रभावळकर व काही ज्येष्ठ व्यंगचित्रकार घेणार आहेत.

या कार्यक्रमात शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांवर आधारित काही ॲनिमेशन फिल्म्सही दाखवण्यात येणार आहेत.
शनिवार, 30 जुलै 2022 रोजी दुपारी 2 ते 2.45 या वेळात शि. द. फडणीस यांच्या कुंचल्यातून उतरलेल्या हास्यचित्रांना सचेत करण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव डॉ. समीर सहस्रबुद्धे आणि कौमुदी सहस्रबुद्धे ‘मिशन ॲनिमेशन’ या कार्यक्रमात सादर करतील.

तर दुपारी 3 ते 4.45 या वेळात व्यंगचित्रविषयक कार्यशाळा होणार असून यात महाराष्ट्रातील काही नामवंत व्यंगचित्रकार सहभागी होणार आहेत. ‘कशी असते डिजिटल रेषा’ या अंतर्गत व्यंगचित्रकलेच्या प्राथमिक माहितीपासून ते संगणकाचा वापर येथपर्यंत विविध बारकाव्यांबद्दल प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. सायंकाळी 5 ते 6.30 या वेळात व्यंगचित्र : कला, कल्पना आणि संधी या विषयावर चर्चा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार, संजय मिस्त्री आणि चारुहास पंडित संवाद साधणार आहेत.

रविवार, 31 जुलै 2022 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळात महाराष्ट्रातून सहभागी झालेले व्यंगचित्रकार व्यंगचित्रांची प्रात्याक्षिके दाखविणार आहेत. तसेच व्यंगचित्रांत ‘वेगळा विचार करताना’ या विषयी चर्चा, व्यंगचित्रांचे विविध प्रकार, शैली तसेच व्यंगचित्रकलेतील वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे कागद आणि डिजिटल माध्यमांबद्दलचे मार्गदर्शन नामवंत व्यंगचित्रकार करणार आहेत.

सायंकाळी 4.30 ते 5.30 या वेळात व्यंगचित्रकलेत मोठा टप्पा गाठलेले हास्यचित्रकार विजय पराडकर यांच्यासमवेत ‘भाषा रेषांची’ या विषयावर गप्पा-टप्पा आणि चित्रमय संवाद आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमांना ज्ञानेश सोनार, कार्टूनिस्टस्‌ कम्बाइनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, चारुहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, गौरव सर्जेराव, सिद्धांत जुमडे, रवींद्र राणे असे व्यंगचित्रकलेच्या वेगवेगळ्या प्रकारात, माध्यमांत काम करणारे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. तीन दिवस विविधरंगी व भरगच्च कार्यक्रम तसेच व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे रसिकांसाठी व्यंगचित्रांची आणि हास्याची मेजवानीच असणार आहे.

Spread the love