Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये विदूषकांसह ‘प्रवेश उत्सव’ साजरा

दीड वर्षानंतर पुणे महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये आनंदाने व उत्साहाने येणार्‍या विद्यार्थ्यांचे चक्क विदूषकांनी स्वागत केले आणि मोठा जल्लोष झाला. या सुखद व अनपेक्षित स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होऊन विद्यार्थ्यांनी विदूषकांभोवती गराडाच घातला.

राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये सकाळी 8.30 ते 9 या वेळेत पालकांसह येणार्‍या या विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेटबाहेर टेंपरेचर व ऑक्सिमीटरद्वारा ऑक्सिजन पातळी तपासली जात होती. विद्यार्थी आत आल्यावर एक विदूषक विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत स्वागत करीत होता. तर दुसरा विदूषक मास्क देत होता.

तसेच या शाळेची संकल्पना मांडून त्याची पूर्तता करणारे पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व शिक्षक विद्यार्थ्यांना पेढा व चॉकलेट देत होते. तसेच सॅनिटायझरची बाटलीही दिली जात होती.

इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने सारे वातावरण भारून गेले होते.

या प्रसंगी विदूषक अनेक गंमती करीत होता आणि विद्यार्थी उत्साहाने दाद देत होते. शाळेतील शिक्षक हातात प्ले कार्ड घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत होते.

‘पुन्हा एकदा घंटा वाजली – शाळा भरली’, ‘करोनाला जाऊ द्या – आम्हाला शाळेत येऊ द्या’, ‘शाळेत नियम पाळू – करोनाला टाळू’, ‘शिक्षण घेऊ हसत हसत – करोना जाईल पळत पळत’, ‘हम बच्चों ने ठाना है – करोना को हराना है’ अशा घोषणांच्या फलकांनी सार्‍यांचेच लक्ष वेधले होते.

ठीक नऊ वाजता विदूषकांनी शाळेची घंटा वाजवली आणि विदूषकाशी हस्तांदोलन करीत व ‘बाय बाय’ करीत हे शाळकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आपापल्या वर्गात गेले.

अनेक पालक विद्यार्थ्याचे विदूषकाबरोबर मोबाईलमधून छायाचित्रही काढत होते. आपल्या पाल्यांच्या या विदूषकांसहच्या आपलेपणाच्या स्वागताने पालकही भारावले होते.

यानंतर सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी या शाळेस भेट दिली. त्यांच्या सोबत एससीईआरटीचे डायरेक्टर देवेंद्रपाल सिंग, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, प्राथमिक शिक्षण विभागप्रमुख मीनाक्षी राऊत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी स्मिता गवळ, पुणे मनपा माध्यमिकचे प्रमुख शिवाजी दौंडकर, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांमधील उत्साह बघून त्यांनी आजचा दिवस म्हणजे ‘प्रवेश उत्सव’ असल्याचे म्हटले.

त्यांनी वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक प्रश्न विचारून त्यांची जणू बुद्धिमत्ता चाचणीच घेतली. या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व उत्तरे देण्याची सफाई बघून त्यांनी विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर शिक्षणकांचेही कौतुक केले.

याबरोबरच शाळेतील शिक्षकांबरोबरही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. या शाळेचा उंचावलेला स्तर कायम राखण्यासाठी शासनातर्फे निश्चित प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी शिक्षण आयुक्तांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले गेले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पायलट प्रोजेक्टमध्ये पाचशे शाळांपैकी आमची शाळा असावी आणि ही शाळा ‘मॉडेल स्कूल‘ म्हणून गणली जावी अशी मागणी केली गेली.

या वेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ‘शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांसह लवकरच या शाळेस भेट देऊ’ असे आश्वासन दिले. आबा बागुल यांनी सर्वांचे आभार मानले.

या वेळी प्रमुख अश्विनी ताठे, सुपरवायझर ज्योती ताठे, प्रेझेंटर योगिता पाटील, दहावीच्या वर्गशिक्षिका रिबेका मगर, शिक्षिका सानिया शेख, सुनीता बाणमारे व इतर शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता.

तसेच नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, अमित बागुल, नंदकुमार कोंढाळकर, विलास रत्नपारखी, सुनील भोसले, बाबासाहेब बोळके, इम्तियाज तांबोळी, गोरख मरळ यांसह नागरिक उपस्थित होते.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love