Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुण्याचा शुभम राठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचना स्पर्धेत प्रथम

आंतरराष्ट्रीय पातळीवर केले भारताचे प्रतिनिधीत्व
आफ्रिकन समुद्रकिनाऱ्यावरील वसाहत या विषयावरील प्रकल्प सादर

जॅक रॉजरी फाउंडेशन फ्रान्स यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन

पुणे: शुभम राठी यांच्या हॅबिटाईड फॉर आर्किटेक्चर अँड इनोवेशन फॉर सी -आफ्रिकन कोस्टलाईन या प्रकल्पाला संपूर्ण जगातून प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना फ्रान्सच्या आर्किटेक्चर अँड इनोवेशन लॉरेट या किताबासाठी नामांकित करण्यात आले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे त्यामुळे भारतीयांसाठी देखील हा प्रकल्प उपयोगी पडणार असल्याचे संगीता राठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी ओमप्रकाश राठी, महेश मालपाणी उपस्थित होते. जॅक रॉजरी फाउंडेशन ही फ्रान्समधील संस्था समुद्रातील अथवा समुद्रावरील वसाहती तसेच अवकाशातील वसाहती याबाबत नवीन दूरदृष्टी वर आधारित अशा वास्तु प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी वार्षिक आंतरराष्ट्रीय वास्तुरचना स्पर्धा आयोजित करते. शुभम राठी यांनी यावेळी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. शुभम राठी हा 26 वर्षाचा असून त्याने मेलबर्न युनिव्हर्सिटी आॅस्ट्रेलियामधून त्याने नुकतेच मास्टर्स आॅफ आर्किटेक्चर पूर्ण केले आहे. यापूर्वी ही त्याने राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळविली आहेत.

जागतिक परिस्थिती पाहता पाण्याचे प्रमाण वाढत आहे आणि जमीन कमी होत जात आहे. काही वर्षानंतर मुंबई पाण्याखाली जाणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सामान्य लोकांना आणि शासनाला सुद्धा परवडेल अशा कमी खर्चिक घरांचा विचार या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे.

आपण सारे परिवर्तनशील जगात राहत आहोत. भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी कल्पकतापूर्वक नवनवीन प्रयोग करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे समुद्राच्या लहरीपणाला आणि प्रकोपाला बळी न पडता अगदी सहजतेने आत्मविश्वासाने आणि कल्पकतेने त्याच सागराच्या पृष्ठभागावर बांबू आणि स्टीलचा वापर करुन तरंगत्या स्वरूपाची टिकाऊ आणि स्वस्त घरे स्वतःच्या हाताने निर्माण करता येणार आहेत, असे शुभम राठी यांनी सांगितले.

सध्या सर्वत्र समुद्रकिनाऱ्यावरील शहरे आणि वसाहतींना अनेक नैसर्गिक समस्या आपत्ती व आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. समुद्राची वाढती पातळी समुद्रकिनाऱ्यावरील किनारे खचणे, जैवविविधता धोक्यात येणे अशा बाबींचा समावेश होतो. भारत, आफ्रिका, बांगलादेश अशा अनेक देशांमध्ये सागरी किनाऱ्यालगत राहणारे आपला जीव धोक्यात घालून जगत असतात. म्हणून अशा ठिकाणी नवीन प्रकारची टिकाऊ, लवचिक तसेच स्थानिक साधनसामग्रीचा उपयोग करून स्वस्त अशी उपयुक्त वास्तुरचना उभारणे ही काळाची गरज आहे.

हा प्रकल्प तयार करीत असताना आफ्रिकन सागरी किनाऱ्याच्या दृष्टीने अनुकूलता टिकाऊपणा आणि स्वस्तपणा ही आव्हाने समोर होती. पाण्यावर तरंगण्याचा नियमांचा बारकाईने अभ्यास करून तरंगती वसाहत निर्माण करताना जवळपासच्या स्थानिक साधनसामग्रीचा कटाक्षाने उपयोग करण्याचे सुचवले आहे. ही वास्तुरचना उभारणे अगदी सोपे असून त्यातील जोडणीची कामे सहजगत्या करता येण्यासारखी आहेत. त्या व्यक्तींना आपले घर उभारले असल्याचा आनंद व मालकीपणाची भावना जोपासता येणार आहे.

Spread the love