Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश रौप्य तर सोनिया कांस्य पदकाची मानकरी

तिसरी माऊंट एव्हरेस्ट चषक खुली तायक्वांदो स्पर्धा

पुणे / प्रतिनीधी : जी२ दर्जाच्या तिसऱ्या माऊंट एव्हरेस्ट चषक खुल्या तायक्वांदो स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीने रौप्य तर सोनिया भारद्वाजने कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेमुळे दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय रांकिंग सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

नेपाळ येथील पोखरा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपचे सहाय्य असणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी पदकाला गवसणी घातली. शिवांश त्यागीने आपल्या सर्वच लढतीमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. मात्र, अंतिम लढतीत भारताच्या खेळाडूकडून पराभूत व्हावे लागल्याने शिवांशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सोनिया भारद्वाजने देखील चमकदार कामगिरी बजावताना कांस्य पदकाची कमाई केली. सोनियाला देखील दुसऱ्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी झालेल्या सर्व लढतीत सोनियाने आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्ध्यांना नॉकआऊट केले. या स्पर्धेमुळे आम्हा दोघांचेही आंतरराष्ट्रीय मानांकन सुधारणार असून भारतात परतल्यावर पुन्हा नव्या स्पर्धेसाठी कसून सराव करणार असल्याचे सोनिया भारद्वाज यांनी सांगितले.

याविषयी बोलताना उद्योजक पुनीत बालन म्हणाले, दोन्ही गुणवान खेळाडूंनी भारतासाठी पदक आणले ही बाब सुखावणारी आहे. सरावातील सातत्य आणि आक्रमक शैली यामुळेच दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावत आहेत. आगामी स्पर्धेत देखील सुवर्ण पदकासाठी ते नक्की प्रयत्न करतील, असा आम्हाला विश्वास आहे.

Spread the love