Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वदिनी
ज्ञानसरिता ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वदिनी गरवारे महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालयादरम्यान ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ढोल-ताशा, टाळ मृदुंगाच्या साथीने झालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील ३० महाविद्यालयांतील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ग्रंथदिंडीला झेंडा दाखवला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के, ज्येष्ठ साहित्यिका श्यामा घोणसे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस, डॉ. सुनील भंडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले या वेळी उपस्थित होते.

ज्ञानसरिता दिंडीमध्ये ढोलताशा आणि टाळ मृदुंगाचा गजर करत पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथ असलेल्या पालख्या खांद्यावर घेतल्या होत्या. तसेच वाचनाचे महत्त्व, महापुरुषांचे विचार सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. महर्षी वाल्मिकी, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, लहुजी वस्ताद साळवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महादजी शिंदे, क्रांतिवीर उमाजि नाईक, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिवीर चाफेकर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि संविधान दिंडी यांचा समावेश होता.

बालवाचकांची दिंडी
लोकसेवा ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक” असा संदेश देत बालभारती ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गावर बाल साहित्य दिंडी काढण्यात आली. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक ल. म. कडू, राजीव तांबे, कवयत्री डॉ. संगीता बर्वे, श्यामची आई चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ, बालसाहित्यिक (लेखिका) आराध्या नंदकर, पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक ज्ञासाचे युवराज मलिक, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, ईस्कूलच्या मुख्याध्यापिका चैत्राली जैन, संवाद पुणेचे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. रंगीबेरंगी फुगे सोडून बालदिंडीचा प्रारंभ झाला. ढोल -लेझीम पथक, पालखी, महाराष्ट्राची महान संत परंपरा, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेषभूषेतील मुले, कॉमिक वर्ल्ड, मोराल स्टोरीज, विविध राज्यातील पारंपारिक वेषभूषेतील बाल कलाकार, ऑटो बिओगर्गिस, नो आबाऊट पोएट, रामायणातील वेषभूषेतील कलाकार असे सुमारे पाचशे शालेय विद्यार्थी बालदिंडीमध्ये सहभागी झाले.
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात स्थिर, शाश्वत जीवन जगता यावे यासाठी वाचन आवश्यक आहे, असे मत कडू यांनी मांडले. पुस्तके समाजाला आणि जीवनाला जोडतात. त्यामुळे मुलांना पुस्तके वाचनाची गोडी लावणे आवश्यक असून दिंडीतील वारकरी पुणे पुस्तक प्रदर्शनाचे ब्रँण्ड अम्बेसिडर असल्याचे मलिक म्हणाले.

Spread the love