पुणे : प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते, मात्र परत – परत एकच चूक होऊ नये अश्या मतांचा मी आहे. कुठलाही आणि कितीही मोठा कलाकार असाल तरी त्यांच्याकडे अपमान, नकार पचवण्याची ताकद असलीच पाहिजे. अपमान का झाला ? हे समजून घेऊन काय करायचे नाही हे ठरवले की आपण योग्य दिशेने जातो असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने – नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी केले.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर ५५ वा वर्धापन दिन सोहळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी थेट भेट या कार्यक्रमात सौमित्र पोटे यांनी प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते सुखं असतं असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, आजपर्यंत माझे १२ हजार ७२३ प्रयोग झाले आहेत, त्यामध्ये फक्त दोन वेळा प्रयोग रद्द करावे लागले आणि तेही माझा आवाज बसल्यामुळे. माझ्या या प्रवासात माझे सहकारी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते. मला जे हवं होतं ते मिळत नाही असे वाटल्याने एकवेळ थांबाव वाटलं होत पण विचार केला मी दुसरं करणार काय? असा प्रश्न होता. निर्माता म्हणून माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे याचीही जाणीव झाली यामुळे मी तो विचार मनातून काढून टाकला आज मात्र निश्चयाने सांगतो की जो पर्यंत माझे पाय चालतात तो पर्यंत रंगभूमीची सेवा करणार.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाविषयी बोलताना दामले म्हणाले, मी काही बदलायच्या भानगडीत पडत नाही. मी नव्याने करण्यावर विश्वास ठेवतो.आपले यशवंत नाट्य संकुल बंद होते ते सुरू केले. नाट्यसंमेलन ही एक महत्वाची जबाबदारी आहे.ती पार पडणारच. नवोदित कलाकारांना मुंबईत आसरा कसं द्यायचा यावर प्राधान्यक्रमाने विचार करतोय, नाट्यगृहांची दुरावस्था दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नाट्य परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व ५८ शाखांचे ऑडिट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारूडसाम्राट सावता फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भारुडाने झाली. यानंतर वनमाला लोणकर, छाया जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळागौर सादर केली.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी विशेष आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात नमिता पाटील, अर्चना जावळेकर, पूनम कुडाळकर, सुप्रिया जावळेकर, कामिनी गायकवाड, रुही संगमनेर, सीमा पटेल, पूजा निर्भवणे, अलका जगताप, वर्षा पवार,जुई आणि अंजली नागपूरकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांची मने जिंकली. त्यांना वर्षा जगताप, स्वाती लोंढे, गायत्री कद्रेकर यांची गायन साथ लाभली. बारामती अॅग्रोच्या सुनंदाताई पवार, ज्येष्ठ ढोलकी पट्टू पांडुरंग घोटकर, तेजल राजे दाभाडे सरकार ,सोनालीताई मारणे, मीनाताई सातव आणि बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते. लावणी महोत्सवाचे सूत्रसंचालन कुमार पाटोळे, अभिजित राजे यांनी केले.
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !