Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

७० वर्षीय वृद्ध रुग्णाच्या छातीमधील साडे तीन किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

पिंपरी दि.८ऑगस्ट : (पुरुष) ७० वर्षीय वृद्ध रुग्णाला छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांना पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले.

रुग्णाच्या आवश्यक चाचण्यांनंतर छातीमधील अतिशय दुर्मिळ मांसल गाठ कर्करोग सापेक्ष (Solitary fibrous tumor) असल्याचे लक्षात आले. यासाठी शस्त्रक्रिया करणे हाच एक मार्ग रुग्णाला पूर्ण पणे बरा करणार होता. अशा केस मध्ये किमो व रेडिओ थेरपीचा उपयोग होत नाही. याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली.

कर्करोग शल्य विभागाचे प्रमुख डॉ. समीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली डॉ. पंकज क्षीरसागर, डॉ. संकेत बनकर व डॉ.सुयश अग्रवाल ह्या कॅन्सर सर्जनच्या चमूतर्फे या रुग्णावर अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गाठ छातीच्या डाव्याबाजूला हृदय व फुप्फुसाच्या रक्त वाहिन्यांना चिकटलेली होती.

या गाठेच्या दबावामुळे या दोन्ही अवयवांना रक्ताभिसरण होत नसल्याने त्याचे कार्य मंदावले होते. या अवयवांबरोबर रक्त वाहिन्यांना इजा नकरता शरीरामध्ये कर्करोगाचा प्रसार रोखण्याबरोबर रुग्णाचा जीव वाचवणे आणि कर्करोगाची गाठ काढण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते.

या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची पूर्ण छाती उघडी करून नंतर मोठ्या रक्तवाहिन्या व हृदय आणि फुप्फुस यांच्या आवरणाला चिकटलेली गाठ तेवढ्याच शिताफीने वेगळी केली सुमारे पाच तास चाललेल्या ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर वीस सेंटीमीटर लांबीची साडे तीन किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

या रुग्णावर चार दिवस अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते या ७०वर्षीय वृद्धाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा कर्करोगाचा धोका पूर्ण पणे टळला आहे.

या रुग्णाला दोन दिवसांनी घरी सोडण्यात येणार आहे. सर्वांचे आभार व्यक्त करताना रुग्ण व नातेवाईक खूप भावनिक झाले होते.

या शस्त्रक्रियेसाठी भूल शास्त्र विभाग प्रमुख डॉ स्मिता जोशी यांची टीम, रेडिओलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. पी के लामघरे व पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. चारुशीला गोरे तसेच हृदय शल्य विभाग प्रमूख डॉ. अनुराग गर्ग व श्वसनविकार विभाग प्रमूख डॉ एम. एस. बरथवाल यांच्या टीमची मोलाची मदत झाली.

“इतक्या जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रणा, जलद उपचार, तज्ञ् डॉक्टर्स, आणि जागतिक दर्जाची सेवा सुविधांमुळे हे शक्य झाले” असे कॅन्सर सर्जरी विभागप्रमुख डॉ. समीर गुप्ता ह्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले “ही शस्त्रक्रिया अतिशय कमी खर्चात १००% यशस्वी केल्याबद्दल रुग्णालयाचे व डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

ह्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयाचा नावलौकिक वाढला असून कॅन्सर रुग्णांना वाजवी खर्चात उपलब्ध असणारा एक आशेचा किरण लाभला आहे. कुलपती डॉ. पी.डी. पाटील सर, प्र कुलपती डॉ.भाग्यश्री पाटील मॅडम, विश्वस्त डॉ. यशराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजीत सिंग व अधिष्ठाता डॉ. जितेंद्र एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ एच एच चव्हाण ह्यांचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात अनेक कॅन्सर शस्त्रक्रिया होत असून हा रुग्णसेवेचा वसा पुढेही असाच चालू राहील अशी हमी” डॉ. गुप्ता ह्यांनी दिली आहे.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love