Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

“पाणी प्रश्नावर अधिक व्यापक कामांची महाराष्ट्रात गरज.” मा.ना.रामराजे नाईक-निंबाळकर

पुणे: दि.१३/१२/२०२१
जागतिक तापमान वाढीमुळे जीवसृष्टीपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो म्हणून संपुर्ण जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी पाणी प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विद्यानंद रानडे लिखित ‘ पाण्या तुझा रंग कसा? ‘ या पुस्तक प्रकाशन व आयोजित चर्चासत्र उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.

महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेने जल जागरूकता अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॅा.सी.डी.थत्ते हे होते.

व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक विद्यानंद रानडे, निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे, निवृत्त सचिव डॅा. दि.मा.मोरे, जलतज्ञ डॅा.प्रदीप पुरंदरे, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष व कार्यक्रम संयोजक अनिल पाटील, राजहंस प्रकाशनचे बोरसे, शरद मांडे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना निंबाळकर म्हणाले कि आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांनी पाण्याच्या प्रश्नावर खुप काम केले आहे त्या तुलनेत महाराष्ट्रात काम झाले नाही. याचा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कोविडपेक्षाही भयंकर जागतिक तापमानवाढ हा गंभीर प्रश्न आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि यांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणी गांभीर्याने पुढाकार घेताना दिसत नाही. जागतिक तापमानवाढ नियंत्रणासाठी जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी केवळ १० ते ६ अशा चाकोरीत काम न करता पाण्याचे सुयोग्य नियोजन व व्यापक जनजागृती करावी असे आवाहनही निंबाळकर यांनी केले.

नंदकुमार वडनेरे म्हणाले कि, सध्या वारंवार पुर, महापुर या समस्या उदभवत आहेत. शासनाने पुरसदृश ठिकाणासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. पाणी हा विषय समज़ुन घेताना पाण्याची आकडेवारी, तार्किकता आणि क्लिष्टता समज़ुन घ्यावी.निवृत्त सचिव डॅा. दि.मा.मोरे यांनीही व्यापक जल जागरूकतेवर भर देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तर जलतज्ञ डॅा.प्रदीप पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या जलसिंचनाचा हतिहास शब्दबद्ध करण्यासाठी शासनाने उपक्रम हाती घ्यावा व जल व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र ( Excellence Centre ) सुरू करावे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव मोडक, भिंगारे, व्ही.एम.कुलकर्णी, घाणेकर, प्रफुल्लचंद्र झपके, कॅप्टन अशोक पाटील, वासतुविशारद अनिल हटकर, बांधकाम व्यावसायिक अरुण शिंदे, प्रकाश देशपांडे, कृषीतज्ञ डॅा.मुकुंदराव गायकवाड, डॅा.विजय परांजपे, प्रा.मोहन पाटील, सुनिल जोशी, जलसंवादचे संपादक डॅा.दत्ता देशकर, पिंपरी चिंचवडचे मा.नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, युवा ऊद्योजक गोविंद सपकाळ, दौंड तालुका काँग्रेसचे नेते नंदकुमार पवार, महा एनजीओ फेडरेशनचे मुकुंदराव शिंदे, हरीश बुटले, शेनोलीकर, प्राचार्य प्रदीप कदम, प्रदीप आहेर यांच्यासह जलक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकप्रतिनिधींच पाणी हा विषय समज़ुन घेण्यासाठी त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करावी अशी विनंती सभापती निंबाळकर यांना केली. यांवर आपल्या भाषणात निंबाळकर यांनी महाराष्ट्र विकास केंद्राचा हा कार्यशाळेचा विचार योग्य असुन या पंचवार्षिकमध्ये एकुण १६२ आमदार विधानसभेत नवीन निवडून आले असुन अशा कार्यशाळेचा उपयोग निर्णय प्रक्रियेत नक्की होईल अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आभार अभियंता मित्रचे संपादक डॅा.कमलकांत वडेलकर यांनी मानले तर सुत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

Spread the love