Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पी. डी. पाटील नव्या भारताच्या विकासाचे भवितव्य ओळखणारे शिक्षणतज्ज्ञ – माशेलकर

पिंपरी, पुणेः डॉ. माशेलकर – भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे. आणखी २५ वर्षांनी स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. आगामी काळात एज्युकेशन आणि फ्यूचर (E=F) अर्थात शिक्षण आणि भवितव्य हेच नव्या भारताचे समीकरण माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. ड़ॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ते ओळखले आहे त्याच विचारांतून त्यांनी आपल्या शिक्षणसंस्थांची उभारणी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपति डॉ. पी. डी. पाटील यांच्या ७०व्या वाढदिवानिमित्त आयोजित गौरव समारंभात डॉ. माशेलकर बोलत होते. सर्वोत्कृष्टता आणि प्रासंगिकता हे पी.डी. पाटील यांनी उभारलेल्या विद्यापीठाचे व शिक्षणसंस्थांचे वैशिष्ट्य असल्याचेही ते म्हणाले.

पिंपरी येथे डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या सभागृहात ड़ॉ. पी. डी. पाटील यांचा गौरव समारंभ झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नागपूरचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, अमेरिकेतील ज्येष्ठ वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. मकरंद जावडेकर, डॉ. डी. वाय, पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपति डॉ. संजय पाटील, पुढारी समूहाचे संचालक डॉ. योगेश जाधव तसेच पी. डी. पाटील यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. पी.डी. पाटील यांचे असंख्य चाहते, स्नेही आणि मित्रमंडळींनी या समारंभाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील विद्यापीठातील तसेच संलग्न संस्थांमधील प्राचार्य तसेच विभागप्रमुखांच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. माशेलकर म्हणाले, “ज्ञान, बुद्धी, व्यक्ती, क्षमता, मूल्यसंवर्धन ही योग्य शिक्षणाची अंग समजली जातात. डॉ. पी. डी. पाटील यांनी या सगळ्यांचा सुरेख मेळ घातला आहे. आपल्या संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देताना त्यांनी सर्वसमावेशकतेवर भर दिला. मेडिकल कॉलेजशी संलग्न रुग्णालयात हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. हे संतुलन त्यांनी योग्य रीतीने साधले आहे. भविष्यातला भारत विकसित करायचा असेल तर ग्रामीण भारत आणि झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या जनतेचा विकास साधणे आवश्यक आहे. शिक्षण हा त्यातला महत्वाचा दुवा ठरू शकतो. या आघाडीवर पी. डी. पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे. “

श्री. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यात शिक्षण हा महत्वाचा मुद्दा होता. इतिहासातला शिक्षणाचा हा मुद्दा वर्तमानातही तितकाच महत्वाचा आहे. डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या शिक्षणसंस्थाचालकांनी अतिशय या क्षेत्राकडे लक्ष दिले. पिंपरी-चिंचवडसारख्या उद्योग नगरीत अतिशय खडतर परिस्थितीत पी. डी. पाटील यांनी आपले सासरे डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. प्रचंड मेहनत घेतली. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण हे मूल्य त्यांनी आजवर सांभाळले. स्वातंत्र्योत्तर भारतात पी. डी. पाटील यांच्यासारख्या व्यक्तींचे नाव अतिशय महत्वाच्या स्थानी राहील. त्यांना समर्पणाने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्रीताई पाटील यांचेही योगदान तितकेच महत्वाचे आहे.

मी अमेरिकेतील अनेक रुग्णालये पाहिली आहेत. ह्युस्टन या शहरात अनेक अद्ययावत रुग्णालये आहेत. मी स्वतः ती पाहिली आहेत. आश्चर्य म्हणजे त्यापेक्षा चांगले रुग्णालय पी. डी. पाटील यांनी पिंपरीत उभारले आहे. सगळ्यांनी हे पाहण्यासारखे आहे.

कोल्हापूर आणि सांगली हे अंतर फार नाही. डी. वाय. पाटील हे माजे मित्र कोल्हापूरचे आणि पी.डी. पाटील सांगलीचे. जावई कसा असावा हे शोधण्याची सूक्ष्म नजर डी. वाय. पाटील यांना होती म्हणूनच त्यांनी आपला जावई फार काळजीपूर्वक निवडला. पी. डी. पाटील यांनी सासऱ्याची ही निवड सार्थ ठरवली अशी मिश्लिक टिपण्णी श्री. शिंदे यांनी केली.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “ऐंशीच्या दशकात वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी विनाअनुदानित शिक्षणसंस्थांना मान्यता देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. सर्वसामान्यांपर्यंत हे शिक्षण पोहचविण्यासाठी ते योग्य होते. मात्र दुर्दैवाने म्हणावे लागते की जुन्या जाणत्या शिक्षणसंस्था त्यावेळी पुढे आल्या नाहीत. मात्र त्या काळात ज्या मोजक्याच व्यक्तींना वसंतदादांची दूरदृष्टी समजली त्यात डॉ. पी. डी. पाटील यांचा समावेश होते. डॉ. डी.वाय. पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी त्यांना शिक्षणसंस्थेचे बीज लावले. शिक्षणाचा गुणात्मक विकास करण्याचा ध्यास घेतला. जागतिकीकरणाच्या आव्हानांना तोंड देऊ शकेल अशा शिक्षणाची गरज पी. डी. पाटील यांनी ओळखली व त्याला पूरक काम केले. “

शिक्षण, आरोग्य, साहित्य, संस्कृती आणि आध्यात्म अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. पिंपरी-चिंचवड सारख्या उद्योगनगरीला ज्ञानोबा-तुकोबाच्या आध्यात्माची संगत आहे. अशा या उद्योगनगरीत पी. डी. पाटील यांनी ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले. न भुतो न भविष्यती असे ते संमेलन होते. संमेलन कसे असावे याचा तो वस्तुपाठ होता, अशा शब्दांत डॉ. मोरे यांनी पी. डी. पाटील यांचा गौरव केला.

डॉ. मिश्रा म्हणाले की, भारतीय संविधानाने सगळ्यांना शिक्षणाचा हक्क दिला आहे. घटनेत त्याचा उल्लेख आहे. मात्र हे शिक्षण दर्जेदार कसे असले पाहिजे यावर फार कमी लोकांनी विचार केला. दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा फार महत्वाच्या असतात. पी. डी. पाटील यांनी हे आव्हान अतिशय यशस्वीपणे पेलले. पी.डी. पाटील यांचा माझा अतिशय जुना स्नेह आहे. अजातशत्रू व्यक्ती म्हणून मी त्यांचा उल्लेख करीन.

सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील भावूक झाले होते. ते म्हणाले, “पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली त्यामुळेच मी इथवर वाटचाल करू शकलो. शिक्षणसंस्थांच्या इमारतींचे बांधकाम मी जातीने लक्ष घालून केले. संस्था म्हणजे चार भिंतींची इमारत नसते. तिथे सौदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ असावा लागतो. मी आत्मस्तुती करतो पण माझ्याकडे ती दृष्टी होती. म्हणून आम्ही इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करू शकलो. पुढच्या टप्प्यात आम्हाला १९९६ मध्ये मेडिकल कॉलेजची परवानगी मिळाली. त्याची इमारत आठच महिन्यात उभारण्याचे आव्हान मी पेलले. त्यानंतरच्या काळात शिक्षणाचा दर्जा यावर जाणीवपूर्वक भर दिला. आज आमचे खासगी मेडिकल कॉलेजशी संलग्न रुग्णालय देशात पंधराव्या स्थानी, पश्चिम भारतात पाचव्या आणि पुण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेंटल कॉलेज देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. आमचे डॉ. डी. वाय पाटील हॉस्पीटल महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे धर्मादाय रुग्णालय आहे.”

या सर्व वाटचालीत मला विद्यापीठातील तसेच संलग्न संस्थांमधील कुलगुरू, प्राचार्य, विभागप्रमुख तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची मोलाची साथ मिळाली. त्यांची साथ नसती तर हे शक्य नव्हते, असेही पी. डी. पाटील म्हणाले. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आता देशाच्या नकाशावर शैक्षणिक हब म्हणून ठळक आले आहे. मला त्यासाठी योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ युनिटेक आणि विद्यापीठ सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या विद्यापीठाची आजवरची वाटचाल अत्यंत यशस्वी झाली आहे. आमच्या सगळ्यांची प्रेरक शक्ती म्हणून ते खंबीर असल्यानेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.
…………….

Spread the love