Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

आमचे पाटील तात्या सुस गावच्या सार्वजनिक जीवनात सर्वात पुढे असणारे सर्वसमावेशक नेते

आम्ही पाटीलकीला पोरके झालो !
आमचे पाटील तात्या सुस गावच्या सार्वजनिक जीवनात सर्वात पुढे असणारे सर्वसमावेशक नेते . गावच्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रभागी असणारे पाटील आज आपल्यात राहीले नाही . ते गेले यावर विश्वास बसत नाही .

सुरवातीला संघवीमधे नोकरी केली. सोपानतात्यांना बरोबर घेऊन दोघा भावांनी खूप मेहनतीने दूध धंदा खूप चांगल्या पध्दतीने केला. नंतर ट्रकचा व्यवसाय .सुरवातीपासुन खूप मेहनत करून नेटका प्रपंच केला. आज त्यांची मुलं अतिशय उत्तम पध्दतीने व्यवसाय करीत आहे. आर्थिक दृष्ट्या भक्कम परीवार असण्यामागे पाटलांचे फार मोठे परिश्रम आहेत.
२००२ साली ग्रामपंचायतीत काम करायला सुरवात केली . वार्षिक उत्पन्न फक्त एक लाख ऐंशी हजार रूपये . यामधे विकास कामे कशी करणार. पाटील आमच्या मागे भक्कम उभे राहीले . काळजी करू नको सुनील आम्ही तुझ्या बरोबर आहोत. ग्रामपंचायतीची सर्व कामे करताना ग्रामपंचायती इतकाच पाटलांचा त्यात सहभाग आहे हे विनम्रतेनं कबुल करतो.

२००३ साल . श्री भैरवनाथाचं मंदीर उभं करण्याचा संकल्प आम्ही सोडला. या कामात पाटील सदैव पुढे. दर रविवारी सकाळी आम्ही मंदीरात बसत असू. झालेल्या खर्चाची माहीती गावक-यांपुढे मांडायचो.तिथुनच मग लोकवर्गणीसाठी बाहेर पडायचो. सर्वजण दिवसभर पुणे व परिसरात वर्गणीसाठी फिरायचो. दूपारी सर्वांचं एकत्र जेवण व्हायचं.मंदीर उभारणीच्या निमित्तानं माझी अन पाटलांची जवळीक वाढली. या काळात सतत एकत्र येणं झालं. रोज सकाळी माझ्याकडे त्यांचं येणं व्हायचं. मीही त्यांच्याकडे जात असे . नामदेवकाकांच्या जुन्या घरी आमच्या बैठका व्हायच्या. त्यात गावच्या विकासावरती सादक बाधक चर्चा व्हायची . सततच्या संपर्कामुळे एकमेकांच्या सवयी , स्वभाव माहीत झाला. नकळत आमची जवळीक वाढली. खूप सा-या गोष्टींवर आमचं एकमत व्हायचं . खरं तर त्यांच्या अन माझ्या वयामधे जवळ जवळ पिढीचं अंतर . परंतू मन जुळायला वयाच बंधन नसतं . आमची मन जुळली . त्यामुळे एकमेकांच्या अनेक खाजगी गोष्टी आम्ही एकमेकाशी बोलत असू. त्यांच्या मुलांची लग्न जुळवताना अंतिम चर्चा त्यांनी माझ्याशी केली. व्यवसायात किती नफा झाला. पुढचं प्लॅनींग काय हे सर्व सांगायचे . त्यांनी मनाई केलेल्या विषयावर मी देखील कधीच बाहेर वाच्यता केली नाही. त्यामुळे आमच्यातील विश्वास वाढत गेला.
गावातील काकड आरती त्यांनी कधीही चुकविली नाही. पहाटे बरोबर पांडुरंगाची आरती सुरू व्हायच्या आगोदर आम्ही दोघे मंदिरात येत असू. त्यांच्या व माझ्या मधे चार दोन मिनीटांचे काय ते अंतर असे. शक्यतो एकाच वेळी आम्ही येत असू.त्यानंतर गावक-यांबरोबर चहापान , गप्पागोष्टी होत. मंदिराचं आणि पाटलांचं एक भावनिक नातं होतं . एकही दिवस त्यांचं देवदर्शन चुकलं नाही . देवदर्शनामुळे गावक-यांच्या गाठीभेटी होत. एकमेकांची ख्यालीखुशाली , विचारपुस करायचे. मग गावात कोणी आजारी असेल तर मला हमखास फोन व्हायचा. अमका तमका आजारी आहे , भेटून जा . मी जाऊन आलो आहे. किंवा ये मंदिराकडं आपण जावू . गावपण जपणं म्हणजे काय ? याचं हे अतिशय योग्य उत्तर आहे. मी विचार करतो बरीच राजकारणातली माणसं ही मताचा विचार डोक्यात विचार ठेऊन ह्या गोष्टी करतात . परंतू पाटलांच्या डोक्यात मताचा विचार कधीच नव्हता .गावातल्या प्रत्येकाच्या सुख दुखःत ते सहभागी असत. त्यांचा पिंड हा माणूसकीचा ,सदैव लोकांमधे मिसळण्याचा होता. लोकांच्या ,गावच्या हिताचा होता . हा मोठा तो छोटा हा कोता विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही. आपपर भाव बाळगला नाही. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. बैलपोळा , दसरा , गावचा भैरवनाथाचा उत्सव , काकडआरती समाप्ती सोहळा , होळीपौर्णीमा या सर्व सणा समारंभ ते पुढे असत. सिमोल्लंघनाला जाताना फोन करणार .
गावात कोणत्याही क्षेत्रात कोणी मोठा होत असेल तर त्याच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहत. गाव आणि गावकरी हिताची भूमिका त्यांनी स्विकारली होती. मला आठवतंय गावातील कान्हुभाऊ साळुंके पुणे मनपाला , संतोष चांदेरे पिंपरी चिंचवड मनपाच्या निवडकणूकीला उभे असताना पाटील आम्हाला बरोबर घेऊन या दोघांच्या प्रचाराला गेले. आपल्या गावची मानमोडे परिवारतील कन्या सिमा आनंदे जिल्हा परिषदेला निवडून आली . मावळमधील कान्हे गावात आम्हाला घेऊन गेले अन सिमाचा सत्कार केला. बाबुरावआप्पांच्या प्रत्येक निवडणूकीत ते पुढे असायचे . प्रत्येक निवडणूकीत ते सदैव माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले. मला सतत म्हणायचे पुढची झेप घे. बास झालं गावातलं राजकारण. मला जिल्हा बॅंकेची पक्षाची उमेदवारी मिळाली. त्या दिवसापासुन ते निवडणूकीत विजयी होईपर्यंत सतत मला फोन करीत . जिथे अडचण असेल तिथे मदत करीत . माझ्या मिरवणूकीत सहभागी झाले. पुणे जिल्हा बॅंकेचा उपाध्यक्ष झाल्यावर त्यांना मोठा आनंद झाला. केलेल्या कामाचं चिज झाल्याचे ते म्हणाले .
पाटील असे मोठ्या मनाचे होते. सर्वांना समान दृष्टीने ते पाहत .

प्राथमिक शाळा आम्ही बांधायला काढली . पूर्वी दोन ठिकाणी शाळा खोल्या होत्या. त्यापैकी आत्ताच्या शाळेच्या जागेवर नविन बांधलेल्या खोल्या होत्या व ग्रामसचिवालयाच्या जागी जून्या खोल्या होत्या . आम्ही नविन बांधलेल्या खोल्या पाडल्या. त्यावर लोकं टिका करू लागली पाटलांनी पुढे होऊन लोकांना समजुन सांगितलं. त्यामुळे आमचं काम सोपं झालं . नुकतंच गाव म.न.पा.तून वगळुन ग्रामपंचायत स्थापन झाली होती. परंतू शाळा अद्याप पुणे म.न.पा. मध्ये होती. याच गोष्टीचा फायदा गावातील आमच्या काही हितचिंतकांनी उचलला. हितचिंतकांनी मनपा शिक्षण मंडळात आमचे विरूध्द लेखी तक्रार दिली. परवानगी न घेता शाळेच्या खोल्या सुनील चांदेरेंनी पाडल्या , त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करा. शिक्षण मंडळाने शाळा बांधकामाला स्टे दिला.
अंजनाकाकू व आम्हाला चिंता वाटू लागली. ते म्हणाले काळजी करू नका. आम्ही आहोत. दिपकभाऊ मानकर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. पाटलांनी सर्वांना गोळा केलं . मला म्हणाले पै. विठोबा मानकर व आपले माजी सरपंच हनुमंतराव सुतार हे दोस्त होते. आपण हनुमंतराव सुतारांना बरोबर घेऊ . पाटील आम्हा सर्वांना घेऊन पुण्यात शिक्षण मंडळात पोहचले. दिपकभाऊंना सर्व सागितलं . भाऊ मला कॅालेजपासुन ओळखत होतेच. हनुमंतरावांना पहाताच दिपकभाऊंनी जुन्या आठवणी काढल्या . लागलीच बांधकामावरचा स्टे उठवला . शाळेचं काम सुरू झालं. आज सुस गावात १२ वर्गखोल्यांची तिन मजली इमारत दिमाखात उभी आहे. विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत आहेत. यामागे आम्ही ग्रामपंचायतीने घेतलेल्या कष्टाबरोबर पाटलांचं देखील तेवढंच महत्वाचं योगदान आहे हे विसरून चालणार नाही.
हिच परिस्थिती चौकातील बहुउद्देशीय “ यशवंतराव चव्हाण सुस ग्रामवैभव “ ह्या ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामाची आहे. पाणीपुरवठा योजना लोकवर्गणी गोळा करताना देखील अशीच मदत त्यांनी केली . बाबुरावआप्पा चांदेरेंच्या पुढाकाराने सुस स्मशानभूमीचे काम सुरू केलं.रोज न चुकता पाटील सर्व ग्रुपला घेऊन त्या ठिकाणी उपस्थित रहायचे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार सकाळी ६:३० वा. भूमिपूजनासाठी आले. त्यावेळी पाटलांना फार मोठा आनंद झाला. दादांनी आठ कोटी रूपये दिल्यावर आप्पांना व मला मोठी शाब्बासकी दिली. गावच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतलेला होता. त्यासाठी ते सदैव तत्पर असायचे .

रोजच्या संपर्कात असणारे तात्या हॅास्पिटलमधे स्ट्रेचरवर निपचीत पडलेले पाहुन हुंदका आवरता आला नाही. ॲंब्युलन्स घेऊन आम्ही आलो. घरी खूप मोठ्या संखेने माणसं जमली होती. अंत्यविधीलाही खूप मोठा जनसमुदाय जमला होता. अलिकडे अंत्यविधीला जास्त लोक जमत नाही.पाटलांचे अंत्यविधीला जमलेला मोठा जनसमुदाय हा त्यांच्या कामाची , माणूसकीची पावती आहे. गावातील लहानांपासुन थोरांपर्यंत त्यांनी संबंध जपले होते. प्रत्येकाशी त्यांचा संवाद होता. म्हणूनच स्मशानभूमीची जागा कमी पडली. गावच्या सार्वजनिक जीवनात त्यांची सतत उणीव भासणार . सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवून माणूसकीपूर्ण जीवन जगणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. स्वर्गीय पाटील तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रध्दांजली .
शोकाकुल
श्री सुनील चांदेरे
उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. पुणे .

Spread the love