Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नव्याने समाविष्ट २३ गावांकडून ग्रामपंचायत नियमानुसारच टॅक्स घ्यावा या मागणीसह राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या..

महापालिकेच्या नाही तर ग्रामपंचायत नियमाप्रमाणे समाविष्ट गावांकडून टॅक्स घेतला तर खऱ्या अर्थाने या २३ गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच नवीन समाविष्ट गावांकरिता आपल्या पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे त्या तरतुदी मध्ये ६० ते ७० कोटी रुपये वर्गीकरण करून देऊन हि रक्कम १५० कोटी रुपये पर्यंत करावी आणि प्रत्येक गावांना ५ ते ७ कोटी रुपये देऊन जी नागरिकांच्या हिताची कामे आहेत, ती तातडीने मार्गी लावावीत व ग्रामपंचायत कार्यकालामध्ये अर्धवट राहिलेली विकास कामे सुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पुर्ण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक दिलीप बराटे, बाबुराव चांदेरे, मा.नगरसेवक प्रदीप ( बाबा ) धुमाळ उपस्थित होते. यावेळी समाविष्ट गावांबाबत अनेक मागण्या आयुक्तांकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांची ग्रामपंचायतीचे दफ्तरे ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे.

त्यामुळे या गावातील नागरिकांना महापालिका आता आपणाकडून कोणत्या नियमानुसार टॅक्स घेणार याची चिंता लागली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे ३० जुन २०२१ ते दि. ३० जुन २०२२ या वर्षामध्ये नवीन समाविष्ट गावांकडून पूर्वीप्रमाणे म्हणजे ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणेच टॅक्स वसूल करण्यात यावा.

ग्रामपंचायतीचा जेवढा आर्थिक निधी आपल्या महानगरपालिकेमध्ये जमा झालेला आहे त्याचा विचार करता ठेकेदारांची जी थकीत बिले आहेत ते बिले सुद्धा पुणे महानगरपालिकेने अदा करण्याची भूमिका लवकरात लवकर घ्यावी जेणे करून या २३ गावातील नागरिकांची महानगरपालिके बद्दल गैरसमज होणार नाही.

◼️२३ गावांमध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा, घनकचरा रोड, विद्युत व्यवस्था आणि जिथे अत्यावश्यक आहे त्याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकणे हि महत्वाची कामे महानगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने हाती घ्यावीत.

◼️समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी पुरविण्याची अत्यंत गरजेचे आहे. अत्यावश्यक असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची लाईन वाढवून द्यावी व गरज असलेल्या ठिकाणी टँकर द्वारे पिण्याचे पाणी देण्याची उपाययोजना करण्यात यावी

◼️पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती दिली जाते ती शिष्यवृत्ती या नवीन समाविष्ट झालेल्या २३ गावातील उत्तीर्ण झालेल्या गोर गरीब विद्यार्थांना देखील मिळावी याकरिता आपण तसा निर्णय घ्यावा,

◼️शहरी गरीब योजनेचा व नागरवस्ती विभागाच्या योजनेंचा लाभ २३ गावातील नागरिकांना मिळण्यासाठी संबंधीतांना आदेश द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love