Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘नारीशक्ती पुरस्कार’ विजेत्या कथक नृत्यांगना सायली अगावणे यांचा मॉडर्न विकास मंडळाच्या वतीने गौरव

सायली अगावणे यांची जिद्द समाजासाठी प्रेरणा देणारी – कुलगुरु डॉ. नितीन करमळकर

पुणे, (प्रतिनिधी): अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, या महिला समाजाला दिशादर्शक असे काम करतात. अपंगत्वावर मात करून शास्त्रीय नृत्य जागतिक स्तरावर घेवून जाण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील कथक नृत्यांगना सायली अगावणे यांनी समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.

अथक परिश्रम केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात हे त्यांनी दाखवून दिले. अनेक विद्यार्थी शारिरीकदृष्ट्या सक्षम असूनदेखील शैक्षणिक, कला, क्रिडा गुणांमध्ये कमी पडतात म्हणून पालक तक्रारी करत असतात. त्यांच्यासाठी सायलीची जिद्द एक प्रेरणा ठरेल असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने पुण्यातील कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली अगावणे यांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ राष्ट्रपती श्री. रामनाथकोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मॉडर्न विकास मंडळाच्या वतीने पौड रोड येथील न्यु इंडिया स्कूल येथे सायली यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्य गुरु शमाताई भाटे, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेशजी पांडे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संदीप बुटाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अजित वाराणसीवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. मनिषा बुटाला यांनी केले.

Spread the love