Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराच्या माध्यमातून पुण्यात नवी उर्जा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ; कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षाचा शुभारंभ सोहळा

पुणे : श्री दत्तात्रेय आणि गणपती बाप्पाच्या भूमीवर येण्याचा मला आनंद आहे. राष्ट्रपती कार्यकाळात मी १२-१३ वेळा महाराष्ट्रात आलो आहे. सामाजिक कार्यात महाराष्ट्र नेहमी अग्रणी राज्य राहिले आहे. महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज आदींनी समाजाला नवी दिशा दिली. यामुळे भारतामध्ये नवीन चेतना जागृत झाली.

दगडूशेठ दाम्पंत्याने पुण्यात गणपती व लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा दिली आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वषार्चा शुभारंभ सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला रामनाथ कोविंद यांच्या पत्नी व भारताच्या प्रथम महिला सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार व्यासपीठावर उपस्थित होते.

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर, आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ डॉ. प्राजक्ता काळे आणि उद्यानकृषी क्रांतीच्या जनक असलेल्या राईज अ‍ँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या चेअरमन व कार्यकारी संचालिका आणि डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ.भाग्यश्री पाटील यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

श्री दत्तमंदिराच्या १२५ वर्षाच्या कायार्चा आढावा घेणा-या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. दत्तमंदिर ट्रस्टचे खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, अक्षय हलवाई आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

रामनाथ कोविंद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सरदारांनी भारत एकजूट करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. आनंदी गोपाळ जोशी या देखील देशातील पहिल्या डॉक्टर महाराष्ट्रातीलच होत्या. तसेच महाराष्ट्रातील प्रतिभाताई पाटील देखील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या.

त्यामुळे महाराष्ट्र भूमीला गौरव प्राप्त झाला आहे. उंच खुर्चीवर बसणे कठीण आहे. तेथे जबाबदारी मिळते, ती पार पाडणे देखील कठीण असते. मात्र, देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून मी खूप काही शिकलो, असेही त्यांनी सांगितले.

दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळकांसोबत राष्ट्रीयता आणि सामाजिक सद््भावनेचा स्तोत्र म्हणून उत्सवाला सुरुवात केली. तेच महाराष्ट्रात जनआंदोलन बनविण्याचे माध्यम झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आंदोलन याच भूमीवर सुरू केले आणि मानवतेसाठी आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राला ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र यापुढेही चांगले योगदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ देशाचे लोकप्रिय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित व्हावा, ही दत्त भक्त आणि विश्वस्तांची इच्छा पूर्ण झाली. दत्त मंदिराला मोठा इतिहास आहे. दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे श्रद्धाळू दाम्पत्य होते. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे.

प्रास्ताविकात अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, भारत विश्वगुरू बनून सर्वांचे नेतृत्व करु दे, अशी दत्तचरणी प्रार्थना करतो. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट या दोन्ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. यापुढेही अखंडपणे कार्यरत राहतील, असेही ते म्हणाले, राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२
:- डॉ.माधुरी कानिटकर – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर सुपरिचित आहेत. त्या भारतीय सैन्यदलातील प्रथितयश वैद्यकीय अधिकारी असून बालरोगतज्ञ देखील आहेत. सैन्यदलातील परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक व सेवा पदक अशी अत्यंत दुर्मिळ पदके त्यांनी प्राप्त केली आहेत. त्यांच्या या कायार्ची दखल घेऊन राज्यपालांनी त्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कुलगुरु म्हणून सन्मानाने नियुक्त केले आहेत.

:- डॉ. भाग्यश्री पाटील – उद्यानकृषी क्रांतीच्या जनक म्हणून ओळख असलेल्या राईज अ‍ँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या चेअरमन व कार्यकारी संचालिका आणि डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरुपदी डॉ.भाग्यश्री पाटील कार्यरत आहेत. अत्याधुनिक फुलांची शेती व आधुनिक पद्धतीने केळी रोपे करुन आवर्षणग्रस्त भागातील शेतक-यांना ती अल्पदरात देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना उपजिविकेचे नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. आंतरराट्रीय स्तरावर शोभिवंत फुलांच्या व्यापारामध्ये भारताचे मोठे नाव झाले. सन २००२ पासून पुण्याजवळील थेऊर येथे ३० एकरांवर पॉलिहाऊस, अत्याधुनिक प्रयोगशाळा व वितरण व्यवस्थेसह शोभिवंत फुलांची व केळीच्या नियार्तीचे केंद्र त्यांनी विकसित केले आहे.

:- डॉ.प्राजक्ता काळे – भारताच्या प्राचीन इतिहासातील वामन वृक्षकला ज्याला आधुनिक काळात बोन्साय आर्ट म्हणून जगभरात प्रसिद्धधी मिळाली, अशा भारतीय परंपरेचे जतन व संवर्धन डॉ. प्राजक्ता काळे करीत आहेत. कान्हे फाटा, मावळ येथे सुमारे ३०० एकरांवर विविध प्रकारच्या बोन्साय वृक्षांची निमीर्ती त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचे बोन्साय तज्ञ म्हणून सन्मानाने नाव घेतले जाते.

Spread the love