Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सुमित्रा महाजन, राहीबाई पोपेरे, शुभांगी भालेराव यांना लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार जाहीर

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे घोषणा ; मंदिराच्या १२६ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये २५ हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी केली.

दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यामध्ये प्रात: आरती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या हस्ते झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.

कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर म्हणाले, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्काराचे यंदा ९ वे वर्ष आहे. महिला सबलीकरण, साक्षरता, सामाजिक बांधिलकी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या महिलांना सन्मानित करण्यात येते. पहिल्या पुरस्कारार्थी सुमित्रा महाजन या लोकसभेच्या माजी अध्यक्षा आहेत. इंदूर मतदारसंघातून सलग ८ वेळा त्या निवडून आल्या असून सर्वाधिक काळ लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या महिला आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.

दुस-या पुरस्कारार्थी राहीबाई पोपेरे या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील महिला शेतकरी असून बीजमाता म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे. पारंपरिक बियाणांच्या वाणांचे संरक्षण व संवर्धन करण्यासोबतच देशी वाणांच्या बियाणांच्या जपवणुकीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिस-या पुरस्कारार्थी शुभांगी भालेराव या सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षिका आणि पौरोहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य करीत आहेत. अथर्वशिर्षाच्या माध्यमातून गणपती उत्सव समाजाचा व्हावा, याकरिता सलगन ३८ वर्षे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ॠषिपंचमीच्या अथर्वशिर्षाच्या भव्य उपक्रमाचे त्या नेतृत्व करीत आहेत.

मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी श्री दत्त महाराजांची सालंकृत पूजा करण्यात आली. तर, ट्रस्टच्या खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे यांनी लघुरुद्र केला. तसेच माध्यान्ह आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.केतन कोठावळे, उपाध्यक्ष जयश्री चौधरी बिडकर, सचिव राहुल कदम, सचिव गंधर्व कवडे, खजिनदार समीर बेलदरे, सदस्य चंद्रसेन कुमकर, श्रद्धा जगताप, मयुरी कासट, प्राजक्ता शिंदे व समस्त कार्यकारिणीच्या हस्ते झाली. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच दिवसभर मंदिरात अन्नदान देखील करण्यात आले.

  • फोटो ओळ : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्धापनदिनी मंदिरात प्रात: आरती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या हस्ते झाली. यावेळी उपस्थित विश्वस्त व भाविक. सोबत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कारार्थी चे फोटो.
Spread the love