Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जलदूत विदर्भ कन्येच्या पाठीवर उपमुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप…

आठ महिने, २३ जिल्हे अन् १० हजार किलोमीटरचा थक्क करणारा सायकल प्रवास

बारामती दि. १७ : पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता, महिला सशक्तीकरणा विषयीच्या जनजागृतीसह राज्यातील स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून सायकलवरुन घराबाहेर पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रणाली चिकटे या विदर्भकन्येच्या सायकलचे चाक काही क्षणासाठी आज बारामतीत विसावले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून २३ जिल्ह्यातून दहा हजार किलोमीटरचा सायकलवरुन प्रवास करणाऱ्या या ध्येयवेड्या जलदूत विदर्भकन्येच्या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

मात्र कोरोना काळात सर्व खबरदाऱ्या घेत सुरक्षित प्रवास करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रणालीला यावेळी आवर्जुन दिल्या. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातल्या पुनवट सारख्या छोट्या गावातील प्रणाली विठ्ठल चिकटे या २१ वर्षीय तरुणीने गेल्यावर्षी पुणे येथील ‘यशदा’च्या जलसाक्षरता विभागांतर्गत जलदूत म्हणून प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षणानंतर पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता, महिला सशक्तीकरण या विषयावर राज्यभर जनजागृती करण्याचा विचार तिच्या मनात आला. नुसता विचार करुन ती थांबली नाही तर प्रणालीने आठ महिन्यापूर्वी तिच्या पुनवट गावातून सायकलवरुन प्रवासाला सुरुवात केली. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रणालीचा हा ध्येयवेडा प्रवास कोणत्याही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत नसून तो वैयक्तिकरित्या सुरु आहे.

या उपक्रमासाठी तिने कोणाचीही मदत घेतली नसून तो स्वजबाबदारीवर सुरु आहे. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील २३ जिल्ह्यातून १० हजार किलोमीटरचा प्रवास करत वाटेत लागणाऱ्या स्थानिक लोकसंस्कृतीचा, पर्यावरणाचा अभ्यास करत प्रणाली आज (दि. १७ जुलै) बारामतीमध्ये आली.

‘यशदा’च्या जलसाक्षर केंद्राचे माजी कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांच्याशी संपर्क साधून जलदूत प्रणालीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घालून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रणालीच्या सर्व प्रवासाची आणि तिच्या उपक्रमाची अस्थेवाईकपणे चौकशी केली. तिच्या या ध्येयवेड्या उपक्रमाबद्दल तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

उपक्रमातील सायकल प्रवासाच्या अखेरच्या टप्याांवर असणाऱ्या प्रणालीला उर्वरीत प्रवासात कोरोना प्रतिबंधाच्या सर्व खबरदाऱ्या घेण्याच्या सूचना देत, तिच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्र्यांच्या कौतुकाने विदर्भकन्या भारावली… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपुलकीने केलेल्या चौकशीने भारावून गेलेल्या प्रणालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. आपल्या उपक्रमाविषयी माहिती देताना प्रणाली म्हणाली, वायू आणि ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी शक्यतो सायकलचा वापर करुया, प्लास्टिकचा वापर टाळूया, लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद करूया जल व मृदसंधारणाची कामे करुया.

प्रत्येकाने शक्य तितकी झाडे लावूया आणि आपला परिसर स्वच्छ ठेऊया. बारामती शहरासह तालुक्यातील पर्यावरण संवर्धन आणि जलसंवर्धनाच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा,असे आवाहन तिने केले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्यभर सायकलवर प्रवास करणाऱ्या प्रणाली चिकटेचा बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी️
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love