Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘जागर भक्ती-शक्तीचा’मधून रसिकांना भक्ती-शक्तीची अनुभूती

आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही – सद्गुरुदास महाराज

पुणे :  “काव्य हे स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब असते. देहभान, आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही. मनातील भाव, सूक्ष्म निरीक्षण, भवतालाशी एकरूपता आणि संवेदनशील मन चांगल्या काव्याची निर्मिती करते,” असे प्रतिपादन शिवचरित्रकार व श्रीदत्त उपासक धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज उपाख्य श्री विजयराव देशमुख यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा मिलाफ असलेल्या व शिवराज्याभिषेक सोहळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या ‘जागर भक्ती-शक्तीचा’ कार्यक्रमाला सद्गुरुदास महाराजांनी शुभाशीर्वाद दिले. जागर भक्ती-शक्तीचा एंटरप्राइजेस, स्वरप्रभा फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, व्हीनस स्पिरिच्युअल अँड हीलिंग कम्युनिटी ट्रस्ट, दुबईस्थित बिलिओ एफएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती आणि शक्तीला जोडणारा हा कार्यक्रम आयोजिला होता.

‘जागर भक्ती-शक्तीचा’ ध्वनिमुद्रिकेचे (अल्बम) प्रकाशन व प्रत्यक्ष सादरीकरण, तसेच ‘गंध अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अल्बममधील १० गाणी कथक नृत्य-गायन स्वरूपात सादर झाली. पराग पांडव यांनी गायन केले. आदिती गराडे यांनी संवादिनीवर साथसंगत केली. सुक्ष्मी कथक स्टुडिओच्या नृत्य कलाकारांनी ‘कवन मांडले शिवराजांचे’ यावर कथक नृत्यातून गण सादर केला.

न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी कवयित्री डॉ. संगीता बर्वे, अल्बमचे निर्माते कवी-गीतकार मंगेश निरवणे, ‘व्हीनस ट्रस्ट’चे शिरीष काकडे, अरुण बाभुळगावकर, सिरम इन्स्टिट्युटचे उमेश कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेखर मुंदडा, राजय शास्तारे, लेखक-दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर, प्रकाशक रुपाली अवचरे आदी उपस्थित होते. सहप्रायोजक प्रसाद पवार कार्यक्रमासाठी खास दुबईहून आले होते. 

‘शिवराय जन्मले हो शिवराय जन्मले’च्या सुरांत दुमदुमलेल्या सभागृहात सळसळत्या शक्तीचा अनुभव रसिकांनी घेतला. सावळ्या विठू माऊलीच्या भक्तीत रसिक नहाले. नृत्यातील तत्कारात अन् स्वरांच्या झंकारात रसिक शहारले. ‘बयो दार उघड’ हा गोंधळ सादर झाला. ‘या मातीला गंध येत असे’, ‘गुरुजी हम शरीर, आप हो प्राण’, ‘आस लगली जी आता’, ‘चारही युगांची सावली माझी विठ्ठल माऊली’, ‘सावळा हरी सावळा’ अशी बहारदार गीते-गवळण सादर झाली.

सद्गुरुदास महाराज म्हणाले, “शक्ती आणि भक्तीचा संगम जगात फक्त महाराष्ट्रातच झाला आहे. गुरू देव दाखवतो; म्हणून पहिला नमस्कार गुरूला असतो. जगाला शिवाजी महाराज खूप कळायचे आहे. त्यांना समजणे एवढे सोपे नाही. त्यांना समजण्यासाठी डोळस दृष्टी हवी. महाराज दुर्गपती होते; म्हणून ते छत्रपती होऊ शकले. शिवाजी महाराज आभाळासारखे मोठे होते. हजारो वर्षातून एखादाच युगपुरुष निर्माण होतो. तो युगपुरुष महाराज होते.”

Spread the love