Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती’ कीर्तन महोत्सवात कीर्तनमहर्षी पुरस्कार प्रदान

कीर्तनाच्या माध्यमातून इतिहासाचा प्रबोध लोकांपर्यंत पोहोचविणे ही शिवरायांची विशेष पूजा राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प.चारुदत्त आफळे यांचे मत

ज्येष्ठ कीर्तनकार किर्तनरंग मिलिंद बुवा बडवे यांना कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान

पुणे : विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी अनेकदा व्याख्यानमाला, चर्चासत्र कार्यशाळा घेण्यात येतात. परंतु या सगळ्यांचा एकत्रित परिणाम कीर्तनातून साधतो. किर्तन हे अनादी काळापासून चालत आलेले व्याख्यान आणि कार्यशाळा देखील आहे. कीर्तनाच्या माध्यमातून संतांची वचने, संतांनी दिलेल्या बोध आणि इतिहासाचा प्रबोध या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविणे ही शिवरायांची विशेष पूजा आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प.चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती या तिस-या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यांच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ कीर्तनकार किर्तनरंग मिलिंद बुवा बडवे यांना कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये पुण्यातील सहा दिग्गज कीर्तनकारांनी आॅनलाईन पद्धतीने कीर्तन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. मिलिंद तायवाडे, सिद्धार्थ कुंभोजकर (तबला), हर्षल काटदरे (आॅर्गन) यांनी साथसंगत केली.

ह.भ. प. चारुदत्त आफळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुतांशी काळ जो विद्यार्थी दशेतील होता. त्याकाळात त्यांनी कीर्तन श्रवण केले आणि त्याचे संस्कार घेतले. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ते पूर्ण वेळ बसल्याचा उल्लेख आहे.

मिलिंदबुवा बडवे म्हणाले, महाराष्ट्रात कीर्तन परंपरा मोठ्या प्रमाणात रुजली. संत नामदेव महाराज उत्तम प्रकारे कीर्तन करत. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ असे नामदेव महाराज म्हणत. पंजाब पासून त्यांनी अटक पर्यंत भगवी पताका फडकाविली. सर्व कलांची जननी असे कीर्तनाला म्हटले जाते. ज्ञानाला श्रद्धेची जोड दिली तर माणसे उच्च दर्जाची घडू शकतात. असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या तिस-या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात.

Spread the love