Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे ४ था आदर्श माता पुरस्कार रत्नाबाई शेट्टी, रुक्मिणी मोहोळ, रुक्मिणी इप्पर यांना प्रदान

महिलांसाठी राजकारण हे सामाजिक कार्याचे व्यासपीठ
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचे प्रतिपादन

पुणे : राजकारणात सन १९९० च्या काळात हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच महिला होत्या. राजकारणात महिलांचा आकडा अतिशय नगण्य होता. सन १९९२ मध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांसाठी ३० टक्के आरक्षण सुरू केले. यामुळेच माझी देखील राजकीय वाटचाल सुरु झाली. राजकारणात आल्यानंतर महिलांना समाजासाठी काम करायला व्यासपीठ मिळू शकते, असे मत खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूस्, पुणेच्या वतीने चौथ्या आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मानाजीनगर न-हे येथील जाधवर संकुलात सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा आदर्श माता पुरस्कार खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई शेट्टी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मोहोळ, पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई इप्पर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ज्ञानोबा इप्पर, प्रभाकर मोहोळ, सौरभ शेट्टी, कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येतो.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, आदर्श माता पुरस्कार हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे. इतिहास पाहिला, तर स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित होती. नंतर महिला शिकल्या, महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात आरक्षण सुरू झाले. प्रत्येक क्षेत्राबरोबर राजकारणात महिलांचे स्थान दिसू लागले. ख-या अर्थाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम महिला करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

मंचक इप्पर म्हणाले, मी आजही कोणत्या मोठ्या संकटात असतो, तेव्हा मला पहिल्यांदा आईची आठवण येते. ते संकट ती दूर करू शकते का हे माहिती नसते. पण त्या संकटाला सामोरे जाण्याचे बळ आणि ताकद मला तिच्याकडून मिळते. ज्याला आई वडिलांचे आशिर्वाद लाभतात जगात त्यापेक्षा मोठा व्यक्ती नाही, असे ही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना रत्नाबाई शेट्टी म्हणाल्या, मी नऊ मुलांची आई आहे. मी मुलांना वाढवले, शिकवले, मोठे केले. मूल आईच्या काळजाचा तुकडा असतो. त्यामुळे आईला कधी दुखवायचे नसते, असेही त्यांनी सांगितले. रुक्मिणीबाई मोहोळ म्हणाल्या, आम्ही वाड्यात रहात होतो, तेव्हा लोक म्हणायचे आई वडील शिकलेले नाहीत तरी मुले पहिल्या नंबरने कशी पास होतात.

मुले शाळेत हुशार होती. मुलाला जसे राजकारणाच वेड लागले, तेव्हापासून तो समाजासाठी काम करतो आहे. जेव्हा त्याचे काम बघते तेव्हा माझ्या डोळ्यात अभिमानाने अश्रू येतात, असे ही त्यांनी सांगितले. रुक्मिणीबाई इप्पर यांनी देखील मंचक इप्पर यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला.

सुरेखा जाधवर म्हणाल्या, संस्थेत अनेक कार्यक्रम होतात. परंतु या कार्यक्रमाला मायेचा पदर आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त इतरांच्या आईचा सन्मान करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर असे संस्कार घडावेत असा उद्देश या कार्यक्रमाचा असतो, असे ही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.

फोटो ओळ – जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूस्, पुणेच्या वतीने चौथ्या आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मानाजीनगर न-हे येथील जाधवर संकुलात सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा आदर्श माता पुरस्कार खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई शेट्टी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मोहोळ, पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई इप्पर यांना प्रदान करण्यात आला.

Spread the love