Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

29व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्‍लोषात उदघाटन

पुणे: केंद्र सरकारने महिला आरक्षण बिल आणले. लोकसभेत पास झाले. आम्ही त्यास पाठिंबा दिला. मात्र या बिलावर अंमलबजावणीची तारीख नाही. ही जुमलेबाजी आहे. हे बिलाच्या अंमलबजावणी 2029 पर्यंत होऊ शकत नाहीत. नुकतीच इंडियाची चेन्नई मध्ये मिटिंग झाली. यामध्ये सोनिया गांधी,प्रियांका गांधी यांनी सांगितले की, इंडियाचे सरकार सत्तेत आले तरच महिला आरक्षणबिलाची अंमलबजावणी होऊ शकते आणि केंद्रात सत्तेत आल्यावर पाहिले ते काम आम्ही करू असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

कला, संस्कृती गायन, वादन, नृत्य यांचा मनोहरी मिलाफ असणारा 29 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे मोठ्या जल्‍लोषात झाले. यावेळी सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी भूषविले. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदर मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, माजी महापौर कमल व्यवहारे, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे मुख्य संयोजक अमित बागुल आणि विश्वस्त सचिव घन:श्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, , सदस्य रमेश भंडारी, नंदकुमार कोंढळकर यांच्यासह आदी उपस्थितीत होते.
विविध क्षेत्रात सातत्याने उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्ती प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, चित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, संपादक व दिग्दर्शक स्वागत थोरात, लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि लावणी सम्राज्ञी रूपा व दीपा परभणीकर यांचा ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिरीष बोधनी यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, देवीची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पाच दिवस जुन्या संसद भवन वास्तूत बोलले. या वास्तूमध्ये अनेक दिगग्ज नेत्यांनी प्रश्न मांडले. ही वास्तू आम्हला सोडायची नव्हती. मात्र ही वास्तू सोडावी लागली आहे. या नवीन संसदेच्या वास्तूमध्ये अंतर निर्माण झाले आहे.
गेली 3 दिवसापासून काँग्रेसनेत्या सोबत आहे. आमच्या बरोबर काँग्रेस, आम्ही आणि शिवसेना सुप्रीम कोर्टात लढा देत आहोत. सध्या संघर्ष सुरू आहे, हाच संघर्ष आम्हाला यश देणार आहे.
पुण्यात कारभारी बदललेले आहेत. त्यामुळे मला खासदार म्हणून नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आमचे नगर सेवक नाही. महापालिका निवडणूक सर्वे चांगला येत नसल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे. लवकर महापालिकेच्या निवडणुका घ्यावात अशी विनंती यावेळी राज्य सरकारला सुळे यांनी केली.
मी आता पुण्यात लक्ष घालणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले. पुढील वर्षी महाविकस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असेही यावेळी त्या म्हणल्या.
उल्हास पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, पुणे नवरात्रो महोत्सव गेली सलग 29 वर्षे अविरतपणे सुरू आहे. आबा बागुल खऱ्या अर्थाने कार्यक्षम नगरसेवक म्हणून काम करीत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होत असल्याने अभिमान वाटतो.
पुरस्काराला उत्तर देताना संजय मालपाणी म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी समृद्धी देणारा आहे. हा सर्व माझ्या टीमचा आहे. गणेश चंदनशिवे म्हणाले, नारी शक्ती ही फार मोठी आहे. संत जनाबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांनी माणुसकीचे विचार परले. अस्मिता जगताप म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला. माझ्या कार्याचे कौतुक झाले, यामूळे आणखी प्रेरणा मिळेल.
सनईच्या मंजुळ सुरांनी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उदघाटन झाले. प्रसंगी देवीची सामुहीक आरती करण्यात आली.
प्रस्ताविक पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले. ते म्हणाले, समाजात विविध क्षेत्रात सातत्याने उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या सोहळ्यात दरवर्षी ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कारा’नं गौरवले जाते. याबरोबरच ख्रिसमस संध्या, हरवलेले संस्कार, काशीयात्रा असे विविध उपक्रम वर्षभर केले जाते.
उद्घाटनप्रारंभी नादरूप संस्थेच्या नृत्यांगना शमा भाटे व सहकारी ‘ओम कालिका’ सादर केले. ‘आंबा आली ओ पाऊली’ हा देवीचा गोंधळ व जागर स्वाती धोकटे, विनोद धोकटे यांनी सादर केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त मानवंदना देणारा ‘शिवराज्याभिषेक’ हा कार्यक्रमदेखील त्यांनी सादर केला. ‘पायलवृंद’ प्रस्तुत ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ हा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे यांनी सादर केला. त्यामध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, सानिया चौधरी, अदिती द्रविड, ऋजुता सोमण, कार्तिकी आदमने, वैशाली जाधव, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर नृत्याविष्कार सादर केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.
स्वीट ९० आशा’ हा मनोहारी कार्यक्रम सादर झाला. गानकोकिळा आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या अवीट गीतांचा नजराणा गीतांजली जेधे, अजय दुधवडे आणि गायक – वाद्यवृंद सादर केला. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले.

Spread the love