Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उदघाटन

पुणे दि.२8: महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने प्रायोजित केलेल्या राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

टिळक स्मारक मंदिर पुणे येथे प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी वस्त्रोद्योग आयुक्त शितल तेली –उगले, हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय निमजे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर द्वारे उत्पादीत उच्च दर्जाच्या उत्पादनाचे तसेच राज्यातील हातमाग विणकर सहकारी संस्थाद्वारे उत्पादीत मालाचे हे प्रदर्शन व विक्री टिळक स्मारक मंदिर पुणे येथे १० एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

हातमागावर उत्पादीत अस्सल सिल्क, टस्सर, करवती साडी व पैठणी साडी, सिल्क टस्सर ड्रेस मटेरिअल, लेडीज-जेंट्स व किड्स गारमेंट्स, बांबू बनाना ब्लंडेड फॅब्रिक्स व साड्या, कॉटन साडी, स्कार्फ, स्टोल, दुपट्टे, टाय, दैनंदिन वापरावयाच्या चादरी, टॉवेल, बेडशिट, दरी, वॉल हॅगींग आणि बरीच उत्पादने असणार आहेत.

या प्रदर्शनीच्या माध्यमातून खरेदीदारांना व उत्पादक विणकरांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांसाठी सकाळी ११ वाजता ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. या ठिकाणी प्रवेश निशूल्क राहणार आहे. प्रदर्शनीत सर्व सहभागी हातमाग संस्थेतर्फे ग्राहकांना वीस टक्के सूट देण्यात येणार आहे.

हातमागावर उत्पादीत मालास बाजारपेठ उपलब्धता, राज्याच्या विविध ग्रामीण भागामध्ये विणकरांद्वारे उत्पादित हातमाग कापड ग्राहकांना थेट उपलब्ध करुन देणे, हातमाग क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या कापडाच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्सची ग्राहकांना ओळख पटवून देणे, हातमागावर उत्पादित होऊ शकणाऱ्या नविनतम डिझाईन्स व त्यासाठी उपलब्ध बाजारपेठेची पडताळणी करुन त्याची माहिती ग्राहकांना व हातमाग विणकरांना करुन देण्याच्या उद्देशाने या हातमाग प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त शितल तेली –उगले यांनी सांगितले. हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Spread the love