Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

आघारकर संशोधन संस्थेत एनआरडीसीच्या आउटरीच सेंटरचे उद्घाटन

प्रयोगशाळेतील विकसीत तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचायला हवेभारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचे मत

पुणे : देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रात काम करणा-यांना प्रोत्साहन आणि आव्हान द्यायला हवे. ज्यामुळे औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. प्रयोगशाळेतील विकसित तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचून त्याचा वापर व्हायला हवा. जोपर्यंत मनुष्यप्राणी अस्तित्वात आहे, तोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. संशोधन क्षेत्रात बरेच चांगले काम होत आहे, परंतु तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे शास्त्रज्ञांना शक्य होत नाही, असे मत भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या (एनआरडीसी) आउटरीच सेंटरचा प्रारंभ पुण्यामध्ये झाला. आघारकर संशोधन संस्था (एआरआय) कॅम्पसमध्ये या सेंटरचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी एनआरडीसी नवी दिल्लीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी, एनआरडीसीचे संचालक शेखर मुंदडा, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन आॅफ सायन्सचे सचिव डॉ. प्रशांत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.

डॉ. शेखर मांडे म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण दोन महत्त्वाच्या अडचणींचा सामना करत आहोत. त्यातील एक म्हणजे तंत्रज्ञानाचे उपयोजन. बरेच चांगले काम या क्षेत्रात होत आहे, परंतु तंत्रज्ञानाचा प्रसार करणे शास्त्रज्ञांना शक्य होत नाही आणि दुसरे औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञान विकास. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञान विकासावर खर्च केला जात नाही. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे यशस्वी उपयोजन व्हायला हवे. एनआरडीसी सातत्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले.

अमित रस्तोगी म्हणाले, एनआरडीसीने जागतिक ओळख मिळवावी अशी आमची इच्छा आहे. संशोधकांना संशोधनासाठी निधी आणि त्यांना पाठिंबा देणे व संशोधनासाठीचे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय शासनाच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. एनआरडीसीच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (एआरआय) कॅम्पसमध्ये आउटरीच सेंटर सुरु झाले आहे. क्षेत्रातील शोधक, अकादमी, स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यास पुढाकार घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शेखर मुंदडा म्हणाले, पुण्यात खूप मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. पुण्यातील आॅटोमोबाईल इंडस्ट्री देखील मोठी आहे. विविध प्रकारचे संशोधन केंद्र देखील पुण्यात आहेत, त्यामुळे संशोधकांसाठी पुण्यात पोषक वातावरण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा आउटरिच सेंटर पुण्यात सुरु करीत आहोत. याचा फायदा निश्चितपणे स्टार्टअप् व तंत्रज्ञान विकसित करण्यास होईल. इतकेच नव्हे, तर लवकरच आघारकर संस्थेने जी जागा दिली आहे, तेथे या सेंटरसोबतच एन्क्युबेशन सेंटर सुरु होईल. याचा फायदा नव उद्योजकांना होईल.

डॉ. प्रशांत ढाकेफळकर म्हणाले, एनआरडीसी ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करणे आणि संशोधनाचा समाजाला फायदा करून देणे हे एनआरडीसीचे मुख्य ध्येय आहे आणि ते काम चांगल्या पद्धतीने होत आहे.

Spread the love