Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सुविधा

  • सुप्रसिद्ध थोरॅसिक ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संदीप अट्टावार यांचा सहभाग

पिंपरी, पुणे : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व संशोधन केंद्रात आता हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणार आहे.

येथील अवयव प्रत्यारोपण केंद्रात यापूर्वीच हृदय, नेत्रपटल, मूत्रपिंड, यकृत या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले असून आता लहान आतडे, स्वादुपिंड, फुफ्फुस या अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळाली आहे. हे रुग्णालय अत्यंत प्रगत व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, उपकरणे आणि पायाभूत सुविधांसाठी अग्रेसर असून पिंपरी- चिंचवडमधील पहिले मल्टिऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून ओळखले जाणार आहे.

हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल सज्ज असून त्यासाठी KIMS इन्स्टिट्यूट फॉर हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटेशन, हैदराबाद येथील थोरॅसिक ऑर्गन ट्रान्सप्लांट अँड असिस्ट डिव्हाइसेसचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. संदीप अट्टावार आणि त्यांची टीम हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणात सहभागी होणार असून पुणे, पिंपरी – चिंचवड परीसरातील रुग्णांसाठी हे वरदान ठरणार आहे.

डॉ. अट्टावार व त्यांच्या टीमने आज (दि २८) रुग्णालयाला भेट दिली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमरजित सिंग, कॉर्पोरेट विभागाचे संचालक डॉ. पी एस गर्चा, उपसंचालक डॉ सी एन जयदीप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच एच चव्हाण, मुख्य संचालन अधिकारी सुनील दाते आणि विविध वैद्यकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमाची नियोजन प्रक्रिया, वैद्यकीय व्यवस्थापन, मूल्यमापन आदी विषयावर डॉ. अट्टावार यांनी डॉक्टरांशी संवाद साधला.

“भविष्यात वैद्यकीय वाटचालीत आमच्या कामगिरी मुळे हॉस्पिटलचा नावलौकीक वाढणार आहे या कार्यक्रमामुळे हृदय व फुफ्फुस ग्रस्थ रुग्णांना फायदाच होईल. आज हॉस्पिटल मधील उच्चप्रतीची रुग्ण सेवा सुविधा, आद्ययावत तंत्रज्ञान, येथील भव्यता, स्वच्छता आदी पाहून मी भारावून गेलो. हॉस्पीटलमध्ये कुशल, अनुभवी तज्ञ व तरुण डॉक्टरांसोबत काम करताना आनंद होईल”, असे प्रतिपादन डॉ. अट्टावार यांनी केले.

‘महत्वपूर्ण घटना’

“जन आरोग्यहितार्थ आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आज हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सुविधेमुळे हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीतील ही महत्वपूर्ण घटना आहे.” अशी भावना कुलपती डॉ. पी. डी पाटील यांनी व्यक्त केली.

‘रुग्णांसाठी नवसंजीवनी’

“डॉ अट्टावार व त्यांची टीम आमच्या हॉस्पिटलशी जोडल्यामुळे मनापासून आनंद होत आहे. या परिसरातील रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदतच होईल”. असे प्रतिपादन प्र- कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी केले.

डॉ. अट्टावार यांच्यासह टीममधील डॉ उन्मील शहा, डॉ प्रभा दत्ता यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. अट्टावार यांनी गेल्या 4 वर्षांत जवळपास 332 थोरॅसिक ऑर्गन ट्रान्सप्लांट केले आहेत, त्यापैकी 203 फुफ्फुस, 92 हृदय आणि 37 हृदय व फुफ्फुस असे दुहेरी प्रत्यारोपण यशस्वी केले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये हृदय व फुफ्फुसांच्या आजारांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग कार्यरत असेल.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी एस गर्चा तर आभार प्रदर्शन डॉ. एम बरथवाल (विभाग प्रमुख श्वसन विकार) यांनी केले.

Spread the love