Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा

साधू-संतांचे विचार आचरणात आणल्यास देश बदलेल
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत – २५ वा दत्तजयंती सोहळा

पुणे : आज देशामध्ये काय चालले आहे, हे आपण पहात आहोत. आई-वडिलांची सेवा मुलांनी करायला हवी. परंतु समाजात वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. वृद्धाश्रम स्थापन करणे ही समाजाची परंपरा नाही. तरी देखील ती संख्या वाढत आहे. साधू-संतांचे विचार अनेकजण ऐकायला जातात. पण नंतर ते विचार विसरले जातात. ते विचार आचारणात आणले तर देश बदलायला वेळ लागणार नाही, असे मत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, आशा कामत, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.

धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार कोव्हिशिल्ड लसीची निर्मीती करणारे सिरम इन्स्टिटयूटचे प्रमुख डॉ.सायरस पूनावाला देखील पुरस्कार देण्यात येणार आहे. महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.

उल्हास पवार म्हणाले, धार्मिकतेला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची जोड ट्रस्टतर्फे दिली जात आहे. गुरुचा महिमा व गुरुचे स्थान महत्वाचे आहे. मातृ देवो, पितृ देवो, आचार्य देवो भव हे आपण म्हणतो, त्याप्रमाणे यांच्यामध्ये परमेश्वराला आपण पहायला हवे. प्रत्येकाच्या जीवनात गुरुला महत्वाचे स्थान असल्याचे आपल्याला दिसून येते.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, दत्तप्रभू माझ्या जीवनात निर्णायक ठरले आहेत. त्यांच्या नावाच्या ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पुरस्कार मी गुरुप्रसाद म्हणून स्विकारला आहे. हे शरीर यापुढे रामकार्याकरिता राहिल. देशात परिवर्तन घडत आहे, ते पुढे चालत होवो. देशाचे सांस्कृतिक संरक्षण करायचे असेल, तर वेगवान पद्धतीने करायला हवे.

हणमंतराव गायकवाड म्हणाले, जवळपास १०० देशात बीव्हीजी घेऊन जायची, हा संकल्प मी केला आहे. बीव्हीजी अनेक मंदिरांचे काम करीत आहे. आता अयोध्येतील श्रीराम मंदिराची सेवा करण्याची देखील संधी मिळावी, असेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. याशिवाय दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. डॉ.पराग काळकर यांनी स्वागत केले. अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

Spread the love