Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राज्यपालांनी केले ‘गोष्ट एका पैठणीची’चे कौतुक राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो

सरळ, साध्या गृहिणीच्या स्वप्नाचा रंजक प्रवास दाखवणारा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विशेषतः महिला प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी अनेक ठिकाणी खास शोजचे आयोजनही करण्यात आले. नुकताच ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला होता.

राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजिलेल्या या शोला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सायली संजीव, गिरीजा ओक- गोडबोले , दिग्दर्शक शंतनू रोडे, पुष्कर श्रोत्री, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर उपस्थित होते. या वेळी लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले होते आणि विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आली.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” राज्यपालांच्या उपस्थितीत हा खास शो संपन्न झाला. त्यांच्याकडून या चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया येणे, चित्रपटाच्या टीमचे कौतुक करणे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या वेळीही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. आमचा चित्रपट इतक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्या पसंतीस उतरतोय, हे पाहून समाधान वाटते.’’

मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे असून सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

Spread the love