Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सदभावना रॅलीतून पोलीस व दिव्यांग सैनिकांचा देशभक्तीचा नारा
खडक पोलीस स्टेशन व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट च्यावतीने गंज पेठ परिसरात आयोजन

गणेशोत्सवात हिंदू – मुस्लिम बांधवांनी दिला एकात्मतेचा संदेश

पुणे : भारत माता की जय…वंदे मातरम चा घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर… सैनिक आणि पोलिसांवरती केलेली फुलांची उधळण… अभिमानाने प्रत्येकाने हाती धरलेला भारताचा तिरंगा… अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात हिंदू आणि मुस्लिम गणेश भक्तांनी दिव्यांग सैनिक आणि पोलिसांसोबत देशभक्ती व हिंदू मुस्लिम एकतेचा नारा दिला. शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशनतर्फे शहराच्या पूर्वभागामध्ये हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत सद््भावना रॅली काढून गणेशोत्सवात एकतेचा संदेश दिला. यावेळी कर्नल वसंत बल्लेवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक रजनी सरवदे, राजेश तटकरे, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप, विष्णू हरिहर, विष्णू ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के, राहुल जोग, राकेश जाधव, राहुल घाडगे, सुरज कुतवळ, अभिजीत पवार, श्री विठे, अतुल बनकर, नितीनकुमार नाईक, सचिन माळी आदी उपस्थित होते. क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, खडकी चे डॉ. कॅप्टन चंद्रशेखर चितळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

सद्भावना रॅलीचे यंदा १० वे वर्ष आहे. शहराच्या पूर्व भागातील गंज पेठेतील जिव्हेश्वर मंगल कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ च्या चौकात समारोप झाला. जय हिंद म्युझिकल बँड मिरवणुकीत सहभागी झाला होता. पूर्वभागातील गणेश मंडळांसह मुस्लिम मुली, भगिनी व बांधवांनी देखील सैनिकांचे स्वागत केले.
राजेंद्र डहाळे म्हणाले, सैनिकांनी सीमेवर दाखवलेल्या शौर्यामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो. ज्या देशाची सुरक्षा उत्कृष्ट आहे त्या देशाची भरभराट होते. आपल्या देशाची तिन्ही दले मजबूत आहे. त्यांच्या शौर्यालाअभिवादन करून त्यांचा सन्मान केला पाहिजे.

कर्नल वसंत बल्लेवार म्हणाले, पूर्ण जगात भारतीय सेना अव्वल आहे. सैन्यात असताना सैनिक देशाची सेवा करतोच परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील तो देशाची सेवा करत असतो, असेही त्यांनी सांगितले. कॅप्टन चंद्रशेखर चितळे म्हणाले, दिव्यांग सैनिकांसमोर आपण निवृत्तीनंतर काय करायचे, हा प्रश्न असतो. त्यांना आयुष्यात त्यांच्या पायावर उभे करुन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याकरीता प्रयत्न होणे आवश्यक आहे. सैनिकांना अडचणीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. तेच काम क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट सातत्याने करीत आहे.

सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, विक्रांत मोहिते, अमर लांडे, कुणाल जाधव, सचिन ससाणे, अनुप थोपटे, उमेश कांबळे, अभिषेक पायगुडे, सुरेश तरलगट्टी यांनी आयोजनात सहभाग घेतला. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love