Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांचा पुण्यात गौरव सोहळा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे तर्फे आयोजन ; उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची उपस्थिती

पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे तर्फे पुण्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांच्या गौरव सोहळ्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते सन्मानसोहळा पार पडणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, सचिव संगिता कांकरीया, संचालक तुकाराम गुजर, निलेश ढमढेरे, रमेश वाणी, अ‍ॅड.अमित निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे आदी उपस्थित होते.

सन्मान सोहळ्यासोबतच असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक विद्याधर उर्फ बाळासाहेब अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणारे असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक प्र.दी. उर्फ आबासाहेब शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, असोसिएशनतर्फे गेली अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणा-या बँकांचा सन्मान केला जातो. तसेच यंदा सहकारमंत्री यांचे खाजगी सचिव व सहनिबंधक संतोष पाटील यांनी ओयासिस पुरस्कार, नागरी बँकांच्या कामकाजात भरीव योगदान देणा-या नंदा लोणकर, पुष्पलता जाधव या दोन संचालिकांचा कै.मीराताई देशपांडे पुरस्कार देऊन कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.

गेल्या तीन वर्षात एनपीए व्यवस्थापनात उत्कष्ट कामगिरी करणा-या वीस नागरी बँकांचा गुणगौरव आणि गेल्या तीन वर्षात असोसिएशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेणा-या सहा नागरी बँकांचा सन्मान देखील कार्यक्रमात होणार आहे. तरी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व पुणेकरांनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Spread the love