Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पर्यावरणासाठी सक्षम राजकीय नेत्यांची गरज – डॉ. माधव गाडगीळ

पुणे, ता. १४: पर्यटनासाठी केवळ निसर्ग राखून ठेवावा, अशी भावना असू नये. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस केला जात आहे. यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सक्षम राजकीय नेतृत्वाची गरज आहे. असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

वनराई फाउंडेशन तर्फे दिला जाणारा स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार-२०२२ डॉ. गाडगीळ यांना खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते. खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, वनराई फाउंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, अध्यक्ष रवींद्र धारिया, अमित वाडेकर, नीलेश खांडेकर, समीर सराफ, रोहिदास मोरे, सागर धारिया, डॉ. सतीश देसाई, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोख एक लक्ष रुपये, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘‘लोकांना जगण्यासाठी विकास हवा आहे. मात्र विकासाच्या नावाखाली त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रस्‍त्याची कामे होत असताना निसर्गाचा विचार केला जात नाही. डोंगर खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे दरडी कोसळत आहेत. हा विकास लोकांना मारण्यासाठी होत आहे असे वाटते. देशात एकेकाळी २० टक्के भाग पर्यावरणासाठी राखून ठेवावी. अशी लोकांची भावना होती. देवराई बद्दल लोकांची अंधश्रद्धा होती, मात्र त्यामागे झऱ्यांचे नैसर्गिक झरे, जैवसंपत्ती टिकून राहते, हा विचार होता”.

टेकड्या वाचाव्यात अशी पुणेकरांची आग्रही मागणी होती. यासाठी ८६ हजार पत्र सरकारला पाठवण्यात आले होते. यासाठी एक राजकीय पाठिंबा म्हणून डॉ. मोहन धारिया यांनी पाठिंबा दिला होता. अशी आठवण यावेळी डॉ. गाडगीळ यांनी सांगितली. तसेच मिझारोम, मणिपूर, मेघालय या राज्यात आधुनिक व्यापारी प्रवृत्तीचा शिरकाव होण्यापूर्वी तेथील पर्यावरणाची स्थिती सुरक्षित होती.

आपला शेजारील भूतान या देशाला हिमनगांचा मोठा धोका आहे. मात्र तेथे अजूनही २० टक्के भागात देवराई सुरक्षित आहे. तेथील राजकीय नेते संवेदनशील आहेत. असेही त्‍यांनी सांगितले.

खासदार बापट, चव्हाण, माजी आमदार पवार यांनी डॉ. मोहन धारियांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. प्रस्ताविक गांधी यांनी केले. आभार खांडेकर यांनी मानले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी केंद्रीय मंत्री, नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष व ‘वनराई’चे संस्थापक स्व. डॉ. मोहन धारिया यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही देशहितासाठी भरीव योगदान दिले होते.

अनेक रचनात्मक कार्याचा पाया रोवला होता. म्हणूनच दरवर्षी त्यांच्या या प्रेरणादायी जीवनकार्याला समर्पित ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ वनराई ट्रष्ट पुणे आणि वनराई फांउडेशन नागपूर यांच्या वतीने प्रदान करण्यात येतो. यंदाच्या वर्षी डॉ. मोहन धारिया यांच्या जयंतीदिनी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आजपर्यंत या पुरस्काराने डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१४), अण्णा हजारे (२०१५), डॉ. जयंतनारळीकर (२०१६), डॉ. मनमोहन सिंग (२०१७), डॉ. एम. एस स्वामीनाथन (२०१८), डॉ. अनिल काकोडकर (२०१९), डॉ. कस्तुररंगन (२०२०) यांना गौरवण्यात आले असून, २०२१ चा पुरस्कार डॉ. ई. श्रीधरन (२०२१) यांना प्राप्त झाला आहे.

Spread the love