Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

धर्म, जातीच्या पलीकडे विचार करण्याची मोकळीक देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी असले पाहिजेत – डॉ. जब्बार पटेल

चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्रपरिवार आयोजित गुरुजन गौरव सोहळा संपन्न

पुणे – धर्म, जातीच्या पलीकडे विचार करण्याची मोकळीक देणारे, आपल्याला लोकशाहीचा अर्थ समजावला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे आपल्या गुरुस्थानी असले पाहिजेत. देशाला विचार स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य मिळवून देणारे संविधान हाच धर्मग्रंथ मानून प्रत्येक गुरुपौर्णिमेला संविधानाचे पर्यायाने डॉ. आबेडकरांचे स्मरण व्हावे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केले.

चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित अठराव्या गुरुजन गौरव सोहळ्यात सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पटेल यांनी वरील मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात डॉ. पटेल यांच्या समवेत माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ आणि उद्योजक व ज्येष्ठ समाजसेवक रमणलाल लुंकड यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अप्पा रेणुसे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, विकास दांगट, प्रकाश कदम, अभय मांढरे, विजय जगताप, बाळासाहेब धनकवडे, युवराज बेलदरे, बाळासाहेब खेडेकर, अश्विनी भागवत, काका चव्हाण, मामा खांदवे , युवराज रेणुसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. पटेल म्हणाले, गुरू हा नदिसारखा असतो. प्रत्येक शिष्य हा त्या नदीतून त्याच्या कुवतीनुसार घेत असतो. अगदी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काहींना काही शिकत असतो. त्यामुळे ज्यांनी मला घडवले त्याची फार आठवण येते. परंतु मी कोणाचा गुरू नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
उल्हास पवार म्हणाले, आपले आई वडील आणि त्यांच्याकडून आलेले चांगले संस्कार पदोपदी जपले पाहिजेत. परंतु अलीकडे मोबाईल नावाच्या यंत्राने घात केला आहे. यामुळे पुढील पिढी निर्बुद्ध होईल का अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. यासाठी प्रत्येकाने भेटीगाठी घेऊन संवाद वाढवला पाहिजे. संवादातून अनेक गोष्टी शिकता येतात. याप्रसंगी डॉ. अरुण अडसूळ, रामणलाल लुंकड यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

अप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविक करताना संगणक युगात संवाद विरळ होत चालला आहे असे सांगतानाच गुरू – शिष्य परंपरा पुढील पिढीला समजावी यासाठी या सोहोळयाचे आयोजन करत असल्याबाबत भुमिका विषद केली. सचिन डिंबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Spread the love