Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालयाचे लोकार्पण

बौद्ध धर्माच्या आचार, विचारांत शास्त्रोक्त विपश्यनेला महत्व

पुणे : “बौद्ध धर्माच्या आचार, विचारांत शास्त्रोक्त विपश्यनेला अतिशय महत्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मौन, विपश्यना गरजेची आहे. त्यातून विचारांची शुद्धी होते. मनाची जडणघडण होते. विपश्यना विहारातून, येथील अभ्यासिका व ग्रंथालयातून समाजाचे वैचारिक आरोग्य अधिक सदृढ होईल,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

उपमहापौर नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनरल बी. सी. जोशी प्रवेशद्वाराशेजारी साकारण्यात आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालयाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले.

प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र नेते परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष शैलेन्द्र चव्हाण, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपाइं महिला सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, पश्‍चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता आठवले, शहराध्यक्षा शशिकला वाघमारे, आनंद छाजेड, औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा स्वप्ना रायकर यांच्यासह भन्तेगण, प्रभागातील मान्यवर पदाधिकारी, धम्म बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप-रिपाइंचे नाते घनिष्ट आहे. ‘रिपाइं’च्या सामंजस्य, प्रभावी योगदानामुळे भाजपाला त्यांचा योग्य वाटा द्यावा लागतो. भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्रित राहतील आणि सत्ता प्रस्थापित करतील. सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून आणि परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून हे सुंदर काम उभा राहिले आहे.

पुण्यातील भाजप-रिपाइंच्या नगरसेवकांनी विलोभनीय असे काम केले आहे. उपमहापौर मिळाल्यानंतर ‘रिपाइं’ने त्याचा चांगला उपयोग करत आपापल्या भागाचा विकास केला आहे, याचा मला अभिमान वाटतो. पाच वर्षांतील भाजप-रिपाइंच्या नगरसेवकांच्या विकासकामांचे पुस्तक व्हायला हवे.”

सुनीता वाडेकर म्हणाल्या, “गेल्या चार वर्षांपासून या विहाराचे काम सुरु होते. माझ्या कार्यकाळात ही वास्तू साकारली, याचे समाधान आहे. नागरिकांना ध्यानधारणा, विपश्यनेसाठी एक चांगले केंद्र उपलब्ध झाले आहे.

अभ्यासिका आणि ग्रंथालयामुळे या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थाने हे स्मारक झाले आहे. वाडेकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अशी चांगली कामे उभारू शकले.”

“प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी येणारी जागेची अडचण आता या वास्तुंमुळे दूर होईल. सांची स्तुपाच्या धर्तीवरील पुणे शहरातील सर्वात मोठ्या व्यासाचा हा घुमट व विपश्यना विहाराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होणार आहे. भविष्यात या वास्तूला एक पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळणार आहे,” असा विश्वास परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले. शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी आभार मानले.

Spread the love