Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

दर सोमवारी ओतूर च्या कपर्दीकेश्वराला तांदळाच्या पिंडी केल्या जात

।। ओतुरचा श्रावण ।।
श्रावण महिना म्हणजे ओतुरचा एक प्रकारे उत्सव असायचा..दर सोमवारी कपर्दीकेश्वराला तांदळाच्या पिंडी केल्या जायच्या (आजही केल्या जातात).देवळाजवळ यात्रा भरायची. पहीला आणि दुसरा सोमवार त्यामानाने गर्दी कमी असायची. त्या दिवशी शाळेला अर्धी सुट्टी असायची.

तिसरा,चौथा आणि असल्यास पाचवा सोमवार हा पुर्ण सुट्टीचा असायचा. तेव्हा गावातले हाँटेलवाले देवळाजवळ आपापली पाले ठोकायचे आणि दुकान लावायचे.तिसऱ्या सोमवारपासून यात्रेची गर्दी वाढायची,गावातल्या हाँटेलांबरोबर बाहेर गावचे अनेक विक्रेते सुध्दा येवून हजेरी लावायचे.

त्याकाळी बदगी बेलापुरचे काही पेढे विक्रेते हजेरी लावायचे.ते देवळाच्या समोरचा जो ऊंच ओटा होता तिथे हे लोक पेढे विक्रीसाठी त्यांच्या लोखंडी ट्रंका घेऊन बसत.त्या ट्रंकेत ओळीने पेढे लावलेले असायचे…खरपुस भाजलेला खवा आणि माफक साखर त्यात असल्यामुळे आजही.

हा बदगीचा पेढा नाव टिकवून आहे.आम्ही त्यावेळी ह्या लोकांकडुन पेढ्याचा नमुना बघायचो ते लोकही जो मागेल त्याला हातावर पेढ्याचा तुकडा ठेवायचे कुणालाही नाही म्हणायचे नाही त.ह्या यात्रेत पानफुलं विकणारे,खेळणी विकणारे, शेंगा ,केळी विकणारे आवर्जून असायचेच पण एका मोठ्या काठीला फुगवलेले फुगे आणि फुग्याला ज्या ठिकाणी हवा भरली जाते तिथे लाकडी पिपाणी लावलेली असायची तिने हवा फुंकली की फुंकली की ती बाहेर पडताना जोरात बाँ…बाँ…असा आवाज निघायचा ते लटकवलेली काठी तिला पावे ,पिपाण्या फुगवून ठेवलेले फुगे..

असे बरेच काही असायचे हे घेऊन तो विक्रेता सगळ्या यात्रेभर फिरून धंदा करायचा…देवळाच्या मागच्या बाजूला बांगड्या विकणाऱ्या आणि हातावर गोंदवणा-र्या वैदीणी बसायच्या… नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओतुरमधील सुतार लोक लाकडी बैल आणि गाड्या विकायला घेऊन बसत…ते बैल आणि गाड्यांना रंग नसायचा आणि सुबकपणाही नसायचा…

ह्या गाड्या यात्रेत खरेदी करणे म्हणजे एक प्रकारची पर्वनीच असायची..मग तिच गाडी घेऊन तिला सुतळी बांधुन आळीभर फीरवायचो…यात्रेत नकली सिनेमावाले यायचे ते दहा पैशात एकावेळी चार मुलांना पहाता येईल अशा रंगीत काचा लावलेल्या एका नळ्याला दोन्ही हात डोळ्याजवळ घेऊन पाहायला सागांयचे आत मधे हिरो हीराँईनचे फोटो सरकत जायचे ते दाखवणारा माणुस जोरजोरात ” राणी का बंगला देखो..राजा राणी देखो..हेमामालिनी देखो..असे म्हणायचा आणि त्या पेटा-र्यात एक एक हिरोहिराँइनचे चित्र पुढे सरकायचे..

हे पहाण्यासाठी मुले नंबर लावून बसायची…ह्याच यात्रेमधे हाताने फीरवणारे पाळणे होते त्यावर लहान मुलांना बसवुन ते फीरवले जायचे..लहान मुलांचे आईवडील ते फीरणाचे मुल कौतुकाने पहायचे..ह्या पाळण्याला पुढे घोडा,बैल,वाघ असे काहीतरी असायचे पण हे प्राणी नक्की कोणते आहेत ते ओळखु सुद्धा येत नसत इतके ते ओबडधोबड असायचे…पण त्याचे सुध्दा यात्रेचे विषेश होते…

गोंदवणा-या बायका त्यांचे साहित्य घेऊन बसलेल्या असायच्या आणि त्यांच्या पुढे गोंदवुन घेणाऱ्या महीला बसलेल्या असायच्या. ह्या गोंदवुन घेणाऱ्या एक हात गोंदवणा-या बाईच्या हाती देत आणि दुस-या हाताने लुगड्याचा पदर डोळ्याला लावुन डोळे घट्ट मिटुन घेत.आपले संपूर्ण नाव किंवा फक्त नव-याचे नाव मोठ्या अक्षरात गोंदवुन घेत.

ह्या वैदीणी अडाणी असल्यातरी कागदावर लिहुन दिलेले जसच्या तसं गोंदवायच्या.काही जणी हातावर तुळशीवृंदावन किंवा साती आसरा असे काहीतरी गोंदुन घेत.आम्ही ह्या गोंदवणा-या बायकांच्या तिथे ऊभे राहुन ती गंमत पहात असायचो..हातावर नव-याचे नाव गोंदुन घेण्याचा एक फायदा व्हायचा..

कुठं नव-याचं नाव सांगायची वेळ आली तर हात पुढे करायचा…तेव्हा गोंदवुन घेणं अभिमानाचं लक्षण समजलं जायचं.पानफुल विकणारी माळ्यांची लहान लहान मुलं दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मागे मागे करून त्यांना पानफुले बेल घ्यायलाच लावायचे….

कपर्दीकेश्वराच्या यात्रेत तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी कुस्त्यांचा आखाडा भरायचा..गावातल्या चावडीपासुन मिरवणुकीने मंडळी वाजतगाजत देवळाकडे येत.पैलवानांना बांधायच्या फेट्याचं गाठोडं एकाच्या डोक्यावर, तर रेवड्यांच गाठोडं एकाच्या डोक्यावर. ह्या मिरवणुकीत गावचे पाटील, पुढारी,सरपंच, प्रतिष्ठित लोक ह्या मिरवणुकीत सामिल होवून आखाड्यात पोहोचायचे..त्यामधे बाहेर गावचे पैलवान सुध्दा असायचे.ओतुरचा तो जुना आखाडा हा जनु नैसर्गिक स्टेडियम होते…तिन्ही बाजुला टेकड्यांचा ऊतार आणि खाली गोल आकारातला कुस्त्यांचा आखाडा…त्यामधे साधीच रेती असायची…हा आखाडा सकाळीच खांडुन माती मोकळी करुन ठेवलेला असायचा…आखाड्याच्या एका बाजुला ओट्यासारख्या जागेवर गावचे प्रतिष्ठित सतरंजीवर बसत…सुरवातीला रेवड्यांच्या कुस्त्या व्हायच्या… लहानमुले काचाकरुन आखाड्यात ऊतरून कुस्त्या करायची त्यात कोण जिंकले कोण हारले असे काही नसायचे सगळ्या मुलांना मुठ मुठ रेवड्या दिल्या जायच्या… अनेक काडी पहीलवान मुले मैदानात ऊतरायची…हे पहायला मोठी गंमत वाटे…त्यानंतर मोठ्या कुस्त्या सुरू होत..काही माणसे हाताला घरुन पहीवानाला गोल फीरवायचे शिंगजोड कुणी आहे का म्हणुन विचारायचे…मग एखादा पहीलवान हात वर करायचा..दोन्ही पहीलवानांना मांन्य झाले की कुस्ती ठरायची आणि पहीलवान काचा करायला लागायचे….हे पहीलवान तिथेच गर्दीत लंगोट लावुन तयार व्हायचे तिथे आडोसा वगैरे काही नसायचे..दंड थोपटत कुस्ती चालु व्हायची…पहीलवानांना जोश यावा म्हणून मांगाचा माणुस जोर जोरात डफ वाजवायचा…तो वाजवताना पहीलवानांच्या भोवती फिरायचा..डफ वाजवताना मधेच ऊड्या मारून डफाची थाप जोरात मारुन रंग भरायचा…वातावरणात ऊत्साह निर्माण करायचा…तेव्हा ओतुरच्या आखाड्यात कुस्त्यांसाठी जुन्नर, नारायणगाव,आळे,बेल्हे,मंचर आणि नगर ह्या ठिकाणचे नावाजलेले पहीलवान येत असत..धोलवड आणि आपल्या गावातील काही मुले कुस्त्यात भाग घ्यायची….ओतुरच्या आखाड्यात खरे आकर्षण होते ते म्हणजे आंबीचा बबन…तो नावाजलेला पहीलवान होता… त्याची कुस्ती शेवटी लावली जायची. त्याला बरेचदा जोड मिळायची नाही तरीही त्याला बक्षीसाची रक्कम देवुन फेटा बांधला जायचा…असाच एक मढ गावचा पहीलवान होता..नाव बहुतेक कुशाबा असे असावे त्यालाही मान दिला जायचा…
तेव्हा कपर्दीकेश्वराच्या मंदीराची व्यवस्था गुरव लोकांकडे होती..एका पिंडीसाठी सव्वा मण तांदुळ लागतो.तेव्हा गुरव झोळी घेऊन घरोघरी फिरून तांदुळ गोळा करायचे..प्रत्येक जण यथाशक्ती मुठभर,घमेलभर ज्याला जमेल तसे तांदूळ देत असत त्यातूनच गुरव पिंडी बनवायचे…त्यावेळी ह्या पिंडीच्या तांदळात सगळ्यांचा सहभाग असायचा..तेव्हा कधीतरी कुणाची तरी नवसाची पिंड असायची..

ज्याचा नवस आहे ते पिंडीचे तांदुळ, मखमली कापड,बेगड,लिंबे आणखी बरेच काही वाजंत्री लावुन मिरवत देवळात घेऊन जायचे..घरातील बायामाणसे लहानमुले हे त्या मिरवणुकीत असायचे..हे साहित्य गुरवाच्या ताब्यात दिले की तिथे गाभाऱ्यात गुरव यजमानांना जोडीने बसवून पिंडीचा संकल्प सोडायचे आणि आरतीकेली जायची…

दुसरे दिवशी सकाळी लवकर मंदिर ऊघडुन दर्शनासाठी खुले व्हायचे…गावातील लोक पैपाहुणे ,लहान मुले रांगेने पिंडीचे दर्शन घ्यायचे…दिवसभर मंदीर परिसर गर्दीने फुलुन जायचा…सगळीकडे उत्साही वातावरण असायचे..तेव्हा शाळेला सुट्टी असल्याने दिवसभरात चार पाच वेळा यात्रेत फीरुन यायचो….सोमवारी बहुतेक घरी ऊपवास असायचा तो रात्री सोडला जायचा…

उपास सोडायला आळुवडी,कारल्याची भाजी,मेथीची भाजी हमखास केली जायची ऊपवास सोडायला जेवायला केळीचे पान घेतले जायचे….कुस्तीचा आखाडा संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण बरेच कमी व्हायचे…ह्या पिंडी गुरव रविवारी रात्री बारानंतर डोळे बांधुन करतात असे तेव्हा बोलले जात असे…सोमवारी रात्री ह्या पिंडीना दहीभाताचा नैवेद्य दाखवून पिंडी ऊतरवल्या जात…

श्रावणी सोमवारी मुळ लिंगावर तांदळाच्या पिंडी असल्याने मंदीरातच मुख्य गाभाऱ्यालगत दुसरे एक शिवलिंग आहे तिथे अभिषेक केले जात होते.देवळात मधे मुख्य चौक आणि त्यालगत तीन बाजुला थोड्या ऊंचीवर पडव्या होत्या ह्या पडव्यात गावातली भिक्षुक मंडळी बसायची …त्यांच्या समोर

एकावेळी दोन चार जोडपी बसायची हे भिक्षुक एकाचवेळी प्रत्येकाला अभिषेकाच्या सुचना देवुन अभिषेक करुन द्यायची…हे लोक तेव्हा ब-र्या पैकी कमाई करुन घ्यायचे…दिवसभर होलसेल अभिषेक सुरू असायचे…ह्या यात्रेत तेव्हा लहान मुले एका ताटलीत गंधाची वाटी घेऊन देवळात जो येईल त्याला गंध लावायचे..काही लोक त्याच्या ताटलीत दोन पैसे पाच पैसे टाकायचे हे पाहून ती लहान मुले हरकुन जायची…आताच्या यात्रेचा विचार करता तेव्हाची यात्रा खुप कमी प्रमाणात होती…

ह्या गुरवांमधे पुर्वापार आलेल्या रुढी प्रमाणे नंतर यात्रेत येणाऱ्या ऊत्पन्नाचे रुपयाच्या हीशोबात आणेवारी प्रमाणे वाटे ठरलेले असायचे…ही यात्रा संपल्यानंतर गाव खुपच शांत झाल्यासारखे वाटायचे आम्हाला तेव्हा हुरहूर लागून रहायची….

त्यानंतर आपल्या गावची यात्रा जास्त मोठ्या प्रमाणात होवु लागली त्याचे कारण म्हणजे आपल्या गावातील श्री.अशोक डुंबरे हे दुरदर्शन मधे आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सादर करायचे त्यांनी एकवर्षी त्यांची टिम यात्रेत ओतुरला आणुन संपूर्ण यात्रेचे शुटिंग घेऊन ते दुरदर्शन वर प्रसारित केले हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पाहीला गेला आणि तेथून पुढे आपल्या यात्रेचे स्वरूप खुपच मोठे झाले.

आता मात्र ओतुरच्या श्रावणी सोमवारच्या यात्रेचे स्वरूप पार बदलून गेले आहे....आता ह्या यात्रेसाठी पुणे,मुंबई, नगर आणि पर राज्यातुनही ठिकठिकाणचे लोक यात्रेत गर्दी करतात तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी गर्दीचा ऊच्चांक होतो दोन तिन लाखाच्या वर लोक ह्या यात्रेला हजेरी लावतात...

ह्यावर्षी तर कपर्दीकेश्वराच्या मंदीराचा मोठ्या स्वरूपात जिर्णोद्धाराचे काम चालु असुन हे काम आमचे मित्र ओतुरचे रहिवासी श्री. रमेशजी डुंबरे यांचे माध्यमातून केले जात आहे.त्यासाठी देवधर्म संस्थेचे अध्यक्ष श्री अनिलशेठ तांबे याचे मोलाचे सहकार्य आहे....मंदिराचा संपूर्ण परिसर दगडी बांधकाम करुन, मंदीराचे आवारात भव्य अशी दगडी दिपमाळ तयार केली असुन तिच्यावर शिलालेख कोरले आहेत...

ह्याच परिसरात नक्षत्रबाग साकारली आहे...संपूर्ण जोते आणि आजुबाजुच्या भिंती दगडी बांधकामात केल्या असुन त्यामध्ये कोनाडे, झरोके ठेवले आहेत... त्याच प्रमाणे ह्या मंदिराच्या बाजुने बारा ज्योर्तिलिंगाची स्थापन करण्यात येत असुन हे कामही पुर्ण होत आले आहे...ओतुरच्या कोंदणात हे मंदिर म्हणजे एक शिल्पकलेचा नमुना म्हणुन कायमस्वरूपी ठेवा झालेला आहे.

Spread the love