Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भक्तीउत्सवात निनादले सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे सूर

द आर्ट आॅफ लिव्हिंग तर्फे आयोजन ; गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग ;
एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम

पुणे : ओम गं गणपतये नमः…गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषाने भक्तीमय झालेल्या वातावरणात एक लाख पुणेकरांनी सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम केला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भक्तीउत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे सूर निनादले. योग, साधना आणि सत्संग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जगभरातील लाखो नागरिकांचे आयुष्य बदलणा-या श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी यावेळी पुणेकरांना मिळाली.

निमित्त होते, द आर्ट आॅफ लिव्हिंग तर्फे कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित भक्तीउत्सव या कार्यक्रमाचे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आर्ट आॅफ लिव्हिंग महाराष्ट्रचे अपेक्स सदस्य राजय शास्तारे, शेखर मुंदडा, डॉ. राजेश धोपेश्वरकर, बलविंदरसिंग चंडोक, धीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.

आर्ट आॅफ लिव्हिंगचे सुप्रसिद्ध गायक विक्रम हाजरा आणि गायत्री अशोकन् हे सत्संगासाठी उपस्थित होते. सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्या जागतिक विक्रमाची नोंद एशिया बुक आॅफ रेकॉर्डस्, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्, वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् लंडन येथे झाली असून जागतिक विक्रमाचे ई प्रमाणपत्र सर्व सहभागींना देण्यात येणार आहे.

श्री श्री रविशंकर म्हणाले, महाराष्ट्र अनेक काळापासून भक्ती प्रेम आणि शौर्या च्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे राष्ट्राचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. भारत देशात सगळे सिध्दांत पद्य स्वरुपात पाहायला मिळतात. आयुर्वेद देखील पद्य स्वरूपातीलच शास्त्र आहे. भगवदगीतेतील ज्ञान देखील गाऊन सांगण्यात आले आहे. त्यामुळे भजन हे आत्मतृप्ती साठी आहे त्यामुळे ते मुक्त होऊन गा. प्राथनेच्या रुपात समर्पण केले नाही तर आपण चिंतामग्न होतो.

ते पुढे म्हणाले, तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देणं आहे. ध्यान आणि मंत्रोच्चारण रोज केले तर त्याचे फळ मिळते. ध्यान योगात भक्ती, कर्म आणि ज्ञान योग आहे. मानसिक शांती साठी ध्यान करणे गरजेचे आहे, हे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आपले जीवन कधी तरी संपणार आहे. त्यामुळे ते हसत आणि चिंतामुक्त होऊन घालवा. प्रत्येक घरात योग पोहोचला पाहिजे, ज्यामुळे प्रत्येक जण निरोगी राहील.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अथर्वशीर्ष पठण रेकॉर्डच्या माध्यमातून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला. गुरुदेव जिथे जातात तिथे भक्तीचा सागर तयार होतो. पुणे हे बुद्धीचे आणि विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे अथर्वशीर्ष पठणाचा असा रेकॉर्ड पुण्यातच होऊ शकतो. आपण मानतो की अथर्वशीर्ष हे स्थिर बुद्धी देते. गणपती ही बुद्धीची देवता आहे. अथर्वशीर्ष हे वैज्ञानिक आहे. सर्वम खलविदं ब्रह्म असे आपण म्हणतो त्यावेळी गणेशाची शक्ती आणि आपली भक्ती आपल्यासमोर येते. गुरुदेव यांनी भारत आणि जगातील अनेक देशात भारतीय संस्कृती आणि अध्यात्म जागृत केले. स्वामी विवेकानंदांनी जसे आपल्या विचारांचे श्रेष्ठत्व जगाला पटवून दिले तेच काम गुरुदेव यांनी केले आहे. विज्ञानातून अध्यात्म हा त्याच्या कार्याचा गाभा आहे. अध्यात्म आणि संस्कृतीमुळे जगाच्या पाठीवर अस्तित्वात असणारी आपली सर्वात जुनी सभ्यता आहे.

Spread the love