Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मानसिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्नपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

आंतर सोसायटी स्पर्धा संपूर्ण पुण्यात व्हावी- मनोज जोशी

प्रत्येक व्यक्ती सदैव मनःशांतीच्या शोधात असतो. नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून जनसामान्यांना मन: शांतीची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित आंतरसोसायटी नाट्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध सिने अभिनेते मनोज जोशी, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल‌ अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे आशुतोष वैशंपायन, परिक्षक यशोधन बाळ, सौ. अनुराधा राजहंस, माधव जोगळेकर आदी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची पोटाची भूक संपल्यावर मनाची भूक निर्माण झाली आहे. त्यासोबतच बुद्धीची आणि आत्म्याची म्हणजे मन:शांतीची भूक ही निर्माण होते. त्यामुळे श्री श्री रविशंकर यांच्या पासून अनेकजण काम करतात. नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून ही मानसिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आगामी काळात ही असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणे हेच जीवन ध्येय आहे.

पुणे ही नाट्य पंढरी असल्याचे सांगत अभिनेते मनोज जोशी म्हणाले की, पुरुषोत्तम, आंतरमहाविद्यालयीन करंडक असे विविध प्रकार ऐकले. नामदार करंडक प्रथमच ऐकला. राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना अशा प्रकारे व्यासपीठ उपलब्ध होणे; हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे ही नाट्य स्पर्धा केवळ कोथरुडपूर्तीच मर्यादित न राहता, संपूर्ण पुणे शहरात ही आयोजित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा केवळ नागरी समस्यापर्रंत मर्यादित न राहता; साहित्य कला आदींच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सदैव कार्यरत राहणे, हे आदर्श लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील हे आपल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून सदैव जनतेच्या सेवेत असतात. त्यामुळे आदर्श लोकप्रतिनिधीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आम्हाला त्यांचा सदैव अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार काढले.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक गटात सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान वुडलॅंड सोसायटीच्या ‘आकाशस्थ बैरागी’; तर खुल्या गटात हा मान बाणेरच्या युथिका सोसायटी ने सादर केलेल्या ‘आम्ही आहोत’ ने पटकावला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सरीता अनिरुध्द (युथिका सोसायटी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री परस्पर पावणेबारा माधवी गणेगावकर पटकावला.

Spread the love