Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि समर्पणाचे आजच्या पिढीने स्मरण करावे – श्रीनिवास पाटील, खासदार आणि माजी राज्यपाल

पुणेः- भौतिक सुखाच्या मागे धावतांना आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली, स्वातंत्र्य यज्ञकुंडात समिधा वाहिल्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांचे आजच्या पिढीने स्मरण करावे. तपस्वी स्वातंत्र्यसैनिक कै. दादासाहेब साखवळकर हे देखील त्याच मुशीतले होते, असे मत खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

तपस्वी स्वातंत्र्यसैनिक कै. दादासाहेब साखवळकर यांच्या जीवनावर आधारीत राष्ट्राय स्वाहा या पुस्तकाचा प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरदार भगतसिंग आणि चार पोवाड्यांचा संग्रह असलेला चतुर्गंध या पुस्तकांचे देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार उल्हासदादा पवार, सुरेश साखवळकर, विजय साखवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले की, सात-याला साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रांची दीर्घ परंपरा आहे. नानासाहेब पाटील यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांपासून लोक कलावंतांपर्यंत अनेकांची नावे सांगता येतील. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला ते म्हणाले, महात्मा गांधींची प्रेरणा घेऊन दादासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि ख-या अर्थाने राष्ट्राय स्वाहा.. असे म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवले.

ब्रिटीशांकडून 1919 साली 300 रूपयांची नोकरी असतांना ती लाथाडून ब्रिटीशांकडून मिळालेली इनामदारी, वतनदारी सर्व काही सोडून केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी राजकारणापेक्षा समाजाकारणात स्वतःला वाहून घेत समाजकार्याचा मोठा आदर्श प्रस्थापित केला.

माजी आमदार उल्हासदादा पवार म्हणाले, दादासाहेबांनी त्यांच्या जमिनदारीला मुरड घातली पण स्वतःच्या तत्वांना मुरड घातली नाही. प्रचंड उच्च कोटीचे भौतिक जीवन जगू शकत असताना ते लाथाडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतले. स्वातंत्र्य लढ्याचा काळ हा मंतरलेला काळ होता.

असे अनेक स्वातंत्र्य सैनिक होते की, ज्यांचा त्याग आणि समर्पण यांच्या नोंदी इतिहासात नोंदवल्या गेल्या नाहीत. परंतु, यामुळे त्यांचे कार्य आणि त्यांचे महत्त्व कमी होत नाही. वाहून घ्या, या महात्मा गांधींच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद देऊन शब्दशः आपले जीवन वाहून घेतले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुरेश साखवळकर यांनी वडिलांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या कार्याचा धांडोळा घेतला. विजय साखवळकर यांनी नाना पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मसापच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजीव बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवतीस स्वातंत्र्य सेनानी कै. दादासाहेब साखवळकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करण्यात आली. तसेच बकुळ पंडित यांनी वंदे मातरम् सादर करुन भारतमातेस वंदन केले.

डाॅ. मंजिरी तेंडूलकर यांनी श्री शारदा स्तवन केले. डाॅ. प्रशांत साखवळकर यांनी आभार मानले तर प्रा. जयंत जोर्वेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. डाॅ. मंजिरी तेंडूलकर यांच्या पसायदानानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Spread the love